ग्रँड टूरसाठी रस्ते सज्ज करण्याची मोहीम; १३६ किमी मार्गांची तपासणी सुरू

जानेवारी २०२७ मधील 'पुणे ग्रँड टूर' सायकल स्पर्धेसाठी १३६ किमी रस्त्यांची तपासणी होणार. पुणे महापालिकेकडून 'पेव्हटेक'ची नियुक्ती, श्रीनाथ भिमाले यांची माहिती.

पुणे: आगामी जानेवारी २०२७ मध्ये पुणे शहरात दिमाखात पार पडणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘पुणे ग्रँड टूर २०२७’ (Pune Grand Tour 2027) या भव्य सायकल स्पर्धेच्या मार्गांचे नियोजन आणि कामांना आता वेग आला आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेच्या मार्गावरील तब्बल १३६ किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पदपथांच्या दर्जाची कसून तपासणी करण्यासाठी ‘पेव्हटेक कन्सल्टिंग इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ या नामांकित संस्थेची तज्ज्ञ सल्लागार म्हणून अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत या महत्त्वाच्या प्रस्तावास सर्व संमतीने मान्यता देण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

      या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर शहरात येणाऱ्या परदेशी व देशी खेळाडूंना उच्च दर्जाचे रस्ते लाभावेत, यासाठी प्रशासनाने आता पासूनच कंबर कसली आहे. ‘पेव्हटेक’ या सल्लागार संस्थेवर स्पर्धेच्या संपूर्ण मार्गाची सखोल पाहणी करून आंतरराष्ट्रीय मानकांनुसार रस्त्यांची दुरुस्ती व नूतनीकरणाची आवश्यकता निश्चित करण्याची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय, रस्त्यांचे तांत्रिक सर्वेक्षण करणे, स्वयंचलित उपकरणांद्वारे रस्त्यांची पाहणी करून जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम (GIS) प्रणालीवर अद्ययावत देखभाल अहवाल तयार करणे आणि आवश्यक त्या तांत्रिक कामांसाठी महापालिका प्रशासनाला मार्गदर्शन करणे अशी विविध कामे ही संस्था पार पाडणार आहे.

     यापूर्वी पार पडलेल्या ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६’च्या वेळीही पुणे महापालिका हद्दीतील सुमारे ७५ किलोमीटर मार्गावरील रस्त्यांची महत्त्वपूर्ण कामे याच संस्थेने यशस्वीरीत्या पूर्ण केली होती. गेल्या तीन ते चार वर्षांत महापालिकेच्या विविध महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये तज्ज्ञ सल्लागार म्हणून काम केल्याचा दांडगा अनुभव या संस्थेकडे आहे. तसेच, भारतीय रस्ते काँग्रेस (Indian Roads Congress) तसेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (NHAI) या संस्थेची कायदेशीर नोंदणी असल्याने त्यांच्या तांत्रिक कौशल्यावर प्रशासनाचा विश्वास आहे.

     आर्थिक व्यवहारांच्या दृष्टीने, महापालिकेच्या प्रचलित धोरणानुसार पॅकेज एक ते चार मधील कामांच्या प्रत्यक्ष खर्चाच्या १.५ टक्के इतके सल्लागार शुल्क ‘पेव्हटेक’ला अदा केले जाणार आहे. हे शुल्क निविदापूर्व आणि निविदा पश्चात अशा दोन्ही टप्प्यांतील कामांसाठी लागू राहील. विशेष म्हणजे, निविदा पश्चात देय शुल्कातील ५ टक्के रक्कम ही ‘दोष दायित्व कालावधी’ (DLP) पूर्णपणे संपल्यानंतरच अदा केली जाईल, जेणेकरून कामाच्या गुणवत्तेत तडजोड होणार नाही. तसेच, रस्त्यांचा अल्प दुरुस्ती कालावधी लक्षात घेऊन, ठेकेदारांची आणि सल्लागारांची देयके तीन वर्षांत दरवर्षी १० टक्के या प्रमाणे टप्प्याटप्प्याने अदा करण्याची महत्त्वपूर्ण उपसूचना स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आली आहे. या सर्व नियोजनामुळे पुणे ग्रँड टूरचे आयोजन अत्यंत यशस्वी आणि जागतिक दर्जाचे होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

विनापरवाना डीजे गाड्यांवर दहिवडी पोलिसांची कारवाई; ३६ हजारांचा दंड

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software