- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- रिलायन्सच्या ‘बॉम्बे क्रीमरी’ची बाजारात एन्ट्री; दिग्गज कंपन्यांना आव्हान
रिलायन्सच्या ‘बॉम्बे क्रीमरी’ची बाजारात एन्ट्री; दिग्गज कंपन्यांना आव्हान
रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्सकडून 'बॉम्बे क्रीमरी' ब्रँडचे १० रुपयांत आईस्क्रीम लॉन्च. अमूलसह इतर कंपन्यां समोर तगडे आव्हान.
मुंबई: दूरसंचार, रिटेल आणि ऊर्जा क्षेत्रात क्रांती घडवल्यानंतर उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपने आता थेट खाद्य आणि आईस्क्रीम बाजारात आपले बस्तान बसवण्यास सुरुवात केली आहे. रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडने (RCPL) ‘बॉम्बे क्रीमरी’ (Bombay Creamery) या लोकप्रिय ब्रँडच्या माध्यमातून आईस्क्रीम सेगमेंटमध्ये दिमाखदार प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, कंपनीने कप, कोन आणि स्टिक आईस्क्रीमची सुरुवातीची किंमत अवघी १० रुपये ठेवल्यामुळे देशभरातील व्यावसायिक वर्तुळात आणि ग्राहकांमध्ये याची मोठी चर्चा रंगली आहे.
सध्या ‘बॉम्बे क्रीमरी’ची उत्पादने पश्चिम भारतातील निवडक बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली असून, आगामी काळात हा ब्रँड टप्प्याटप्प्याने संपूर्ण देशात विस्तारण्याची रिलायन्सची योजना आहे. रिलायन्सच्या या आक्रमक एन्ट्रीमुळे देशातील आईस्क्रीम बाजारातील स्पर्धा अतिशय तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या अमूलच्या मँगो फ्लेवर स्टिक किंवा काश्मिरी केसर कुल्फीसारख्या उत्पादनांची किंमत ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर किमान २० रुपयांपासून सुरू होते. अशा परिस्थितीमध्ये रिलायन्सने थेट १० रुपयांच्या किंमतीत दर्जेदार आईस्क्रीम बाजारात आणून ग्राहकांसाठी एक अत्यंत स्वस्त आणि उत्तम पर्याय उभा केला आहे.
कंपनीचे संचालक टी. कृष्णकुमार यांनी ‘बॉम्बे क्रीमरी’च्या गुणवत्ते बाबत माहिती देताना सांगितले की, ही सर्व आईस्क्रीम अस्सल डेअरी क्रीमपासून तयार करण्यात आली असून, ती सामान्य भारतीय कुटुंबांच्या बजेटमध्ये बसणारी आहेत. आजच्या काळात ग्राहकांमध्ये व्हॅनिला आणि चॉकलेट सोबतच साल्टेड कारमेल, माचा आणि तिरामिसूसारख्या आधुनिक फ्लेवर्सना मोठी पसंती मिळत आहे. विशेषतः क्विक कॉमर्स आणि फास्ट डिलिव्हरी ॲप्समुळे आईस्क्रीमच्या मागणीचा ट्रेंड आणखी वेगाने पुढे जात आहे. हाच धागा पकडत रिलायन्स आपल्या अवाढव्य वितरक नेटवर्कचा प्रभावी वापर करून स्थानिक दुकानांमध्ये स्वतःचे खास फ्रीझर बसवत असून, याद्वारे अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.
एक्सपर्ट मार्केट रिसर्च च्या आकडेवारी नुसार, भारतीय आईस्क्रीम बाजार सध्या सुमारे १५ टक्के वार्षिक चक्रवाढ वाढीच्या दराने (CAGR) झपाट्याने विस्तारत असून, २०३५ पर्यंत हा बाजार तब्बल १६.१० अब्ज डॉलरवर पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महानगरांसोबतच आता लहान शहरांमध्ये आणि ग्रामीण भागातही आईस्क्रीमची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. रिलायन्सच्या या धोरणात्मक प्रवेशामुळे आणि कमी किमतीतील आक्रमक मूल्यधोरणामुळे बाजारातील इतर दिग्गज शीतपेय व आईस्क्रीम उत्पादक कंपन्यां समोर तगडे आव्हान उभे ठाकले असून, आगामी काळात या क्षेत्रात मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे.
