- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- नामांकित संस्थांनी महापालिका शाळांची जबाबदारी घ्यावी; मंगल प्रभात लोढांचे आवाहन
नामांकित संस्थांनी महापालिका शाळांची जबाबदारी घ्यावी; मंगल प्रभात लोढांचे आवाहन
कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे नामांकित संस्थांना महापालिका शाळा दत्तक घेण्याचे आवाहन. 'ड्रग-फ्री मुंबई' आणि NEP वर भर.
मुंबई: शिक्षण क्षेत्रातील नामांकित संस्था, शाळा आणि शिक्षण तज्ज्ञांनी आपल्या परिसरातील किमान एका महापालिका शाळेच्या शैक्षणिक व भौतिक प्रगतीसाठी पुढे यावे, असे आवाहन कौशल्य विकास व रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थांनी केवळ आपल्या स्वतःपुरते मर्यादित न राहता समाजाप्रती असलेली आपली नैतिक जबाबदारी पार पाडली पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. एका विशेष कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांना संबोधित करताना त्यांनी शैक्षणिक विकासा सोबतच कौशल्य आधारित शिक्षण आणि ‘ड्रग-फ्री मुंबई’ अभियानाबाबत महत्त्वपूर्ण भूमिका मांडली.
महापालिका शाळांच्या विकासासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करताना मंत्री लोढा म्हणाले की, परिसरातील एखादी शाळा दत्तक घेऊन किंवा तिच्या विकासाची जबाबदारी उचलून तिच्या शैक्षणिक प्रगतीत योगदान द्यावे. यासाठी प्रत्येक वेळी मोठ्या आर्थिक मदतीचीच गरज असते असे नाही, तर संबंधित शाळेतील शिक्षकांनी महिन्यातून एकदा महापालिका शाळेला भेट देऊन तेथील शिक्षकांसोबत चांगल्या शैक्षणिक व व्यवस्थापन पद्धती (Best Practices) शेअर कराव्यात. विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवून देऊन आधुनिक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिल्यास महापालिका शाळांमधील गुणवत्तेत मोठा बदल घडून येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील (NEP) कौशल्य विकासाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी लहान वयापासूनच विद्यार्थ्यांना विविध कौशल्यांचे शिक्षण मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासा सोबतच श्रम आणि कष्ट करणाऱ्या व्यक्तींबद्दल आदर निर्माण होतो. ब्रिटिशांच्या राजवटीत मोडून काढलेली भारताची पारंपरिक शिक्षण व्यवस्था, ज्यामध्ये कौशल्य, संस्कार, श्रमप्रतिष्ठा आणि जीवनोपयोगी शिक्षणाचा समृद्ध वारसा होता, तो वारसा नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून पुन्हा उभा राहत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (AI) शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या अमुलाग्र बदलांशी जुळवून घेत शिक्षण पद्धतीत सातत्याने परिवर्तन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
केवळ शालेय शिक्षणा इतकेच विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगत मंत्री लोढा यांनी ‘ड्रग-फ्री मुंबई’ अभियानात राज्यातील शाळांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी प्रत्येक शाळेने दोन पालक, दोन शिक्षक आणि एका समाजसेवी संस्थेचे प्रतिनिधी अथवा समुपदेशकाचा समावेश असलेली एक छोटी समिती स्थापन करावी आणि लहान वयापासूनच विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्ती बाबत जागृती निर्माण करावी, अशी सूचना त्यांनी केली.
पालकांनी केवळ उत्तम शाळा आणि सुख सुविधा उपलब्ध करून दिल्या म्हणजे आपली जबाबदारी संपत नाही, तर मुलांना वेळ, प्रेम, आपुलकी देऊन त्यांच्या आयुष्यातील घडामोडींमध्ये पालकांचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे, असे सांगत त्यांनी पालकांच्या समुपदेशनाची गरजही व्यक्त केली. हा उपक्रम केवळ शासनाचा राहिला पाहिजे असे नाही, तर शाळा, शिक्षक आणि पालकांनी मिळून ही एक व्यापक सामाजिक चळवळ उभारली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
