- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- सहकारी बँकांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर; बाबासाहेब पाटलांची उच्चस्तरीय बैठक
सहकारी बँकांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर; बाबासाहेब पाटलांची उच्चस्तरीय बैठक
वर्धा आणि नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची उच्चस्तरीय बैठक. प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार.
मुंबई: वर्धा आणि नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांशी संबंधित विविध प्रलंबित व प्रशासकीय प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात एक महत्त्वाची उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याबाबतचा तसेच नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वरिष्ठ श्रेणीमध्ये पदोन्नती देण्यासंबंधीचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी थेट मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे.
मंत्रालयात पार पडलेल्या या बैठकीत वर्धा आणि नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसमोरील विविध प्रशासकीय अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यातील एकूण १६ सहकार संस्था व बँकांशी संबंधित विविध प्रकरणांवर योग्य तो निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री स्तरावर प्रस्ताव सादर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच, संबंधित वित्तीय संस्थांच्या प्रमुखांसोबत तातडीने विशेष बैठक आयोजित करून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या अडचणी दूर करणे आणि शेतकऱ्यांच्या पीक कर्जवाटपाबाबत आवश्यक ती पावले उचलून योग्य निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले.
या उच्चस्तरीय बैठकीस सहकार विभागाचे सहसचिव संतोष पाटील, महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या निर्णयामुळे सहकार क्षेत्रातील या प्रमुख बँकांच्या कामकाजाला अधिक गती मिळण्या सोबतच शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांच्या मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
