महाराष्ट्र-न्यू साउथ वेल्स भागीदारीला नवे बळ; विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण करार

महाराष्ट्र आणि ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स राज्यादरम्यान महत्त्वाचे सामंजस्य करार. स्वच्छ ऊर्जा, शिक्षण व तंत्रज्ञानात सहकार्यासाठी ९० दिवसांत कार्यगट स्थापन होणार.

मुंबई: महाराष्ट्र आणि ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स राज्यांदरम्यान २०१२ पासून चालत आलेल्या भागीदारीला अधिक व्यापक, महत्त्वाकांक्षी आणि परिणामाभिमुख स्वरूप देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई येथील ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि न्यू साउथ वेल्सचे प्रमुख (प्रीमियर) क्रिस मिन्स यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित उच्चस्तरीय बैठकीत विविध क्षेत्रांतील सहकार्यासाठी सामंजस्य करार करण्यात आले. वित्तीय सेवा, स्वच्छ ऊर्जा, प्रगत उत्पादन, महत्त्वपूर्ण खनिजे, कृषी तंत्रज्ञान, आरोग्यसेवा, शिक्षण, कौशल्य विकास, तंत्रज्ञान, संस्कृती आणि क्रीडा या क्षेत्रांचा यामध्ये समावेश असून, हे करार २०४७ पर्यंत महाराष्ट्राला एक विकसित आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक राज्य बनवण्याच्या उद्दिष्टाशी पूर्णपणे सुसंगत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

        भारत आणि ऑस्ट्रेलियाची अनुक्रमे वित्तीय व व्यावसायिक प्रवेशदारे असणाऱ्या मुंबई आणि सिडनी यांच्यातील व्यावसायिक संबंधांना अधिक बळकट करण्यावर यावेळी भर देण्यात आला. न्यू साउथ वेल्स मधील वित्तीय संस्था, व्यावसायिक सेवा कंपन्या, पायाभूत सुविधा गुंतवणूकदार आणि सुपरॲन्युएशन फंडांनी महाराष्ट्राला भारतातील गुंतवणुकीचे प्रमुख प्रवेशद्वार म्हणून पाहावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. राज्यातील प्रगत वाहतूक पायाभूत सुविधा, औद्योगिक कॉरिडॉर, नागरी विकास, अक्षय ऊर्जा आणि डिजिटल पायाभूत सुविधांच्या विस्तारामुळे जागतिक गुंतवणूकदारांसाठी दीर्घकालीन आणि मोठ्या संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी नमूद केले. इलेक्ट्रिक वाहने, बॅटरी, इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रगत उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्र सक्षम परिसंस्था उभारत असून, न्यू साउथ वेल्सकडील खाण तंत्रज्ञान, स्वच्छ ऊर्जा आणि नवोन्मेषाच्या अनुभवाचा लाभ घेत बॅटरी उत्पादन, हरित हायड्रोजन व ऊर्जा साठवणूक क्षेत्रात संयुक्त प्रकल्प विकसित केले जाऊ शकतात.

          कौशल्य विकास आणि शिक्षणाच्या क्षेत्रात न्यू साउथ वेल्सच्या ‘टेक्निकल ॲण्ड फर्दर एज्युकेशन’ (TAFE) संस्था आणि महाराष्ट्रातील औद्योगिक व कौशल्य विकास संस्थांमध्ये संयुक्त अभ्यासक्रम, प्रशिक्षक प्रशिक्षण, डिजिटल शिक्षण आणि उद्योगाशी संलग्न प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविण्याची मोठी संधी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच, न्यू साउथ वेल्स मधील नामांकित विद्यापीठांनी नवी मुंबई जवळील नियोजित आंतरराष्ट्रीय शिक्षण नगरीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. न्यू साउथ वेल्सचा दुष्काळ व्यवस्थापन, आधुनिक शेती आणि जलसंधारणाचा दांडगा अनुभव मराठवाडा व विदर्भाच्या विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो, असे सांगत त्यांनी कृषी विद्यापीठां मध्ये भागीदारी वाढवण्याची अपेक्षा व्यक्त केली. या सर्व करारांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढील ९० दिवसांत एका संयुक्त कार्यगटाची स्थापना केली जाणार असून, हा गट प्रमुख प्रकल्प निश्चित करून दोन्ही राज्यांतील संस्थांच्या जबाबदाऱ्या ठरवेल आणि नियमित प्रगतीचा आढावा घेईल.

           महाराष्ट्र आणि न्यू साऊथ वेल्स राज्यांमधील आर्थिक संबंध अधिक दृढ करताना खाणकाम, तंत्रज्ञान, पर्यटन, शिक्षण, प्रगत उत्पादन, सर्क्युलर इकॉनॉमी आणि आरोग्यसेवा या क्षेत्रांवर विशेष भर दिला जाईल, असे न्यू साऊथ वेल्सचे प्रमुख क्रिस मिन्स यांनी सांगितले. दोन्ही राज्यांमधील हा करार आर्थिक संबंधांना एक नवी दिशा देणारा ठरेल, असे ते म्हणाले. महाराष्ट्रातील तरुण मोठ्या प्रमाणावर शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियात जात असून, न्यू साऊथ वेल्स मधील भारतीय-ऑस्ट्रेलियन समुदायाचे महाराष्ट्राशी कौटुंबिक, सांस्कृतिक आणि भाषिक संबंध असल्याचे सांगत त्यांनी हा समुदाय दोन्ही राज्यांमधील मैत्रीचा सर्वात महत्त्वाचा दुवा असल्याचे गौरवोद्गार काढले. ऑस्ट्रेलियन विकासात भारतीय वंशाच्या नागरिकांचे योगदान मोठे असून, त्यांच्या भारतीय वारशाचा अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले. दोन्ही अर्थव्यवस्थांच्या परस्परपूरक क्षमतेचा फायदा घेत द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेल्या दूरदर्शी पुढाकाराचे कौतुक करून, त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना सिडनी भेटीचे अधिकृत निमंत्रण दिले.

      या उच्चस्तरीय बैठकीस राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल, कौशल्य विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा वर्मा, उद्योग सचिव डॉ. अन्बळगन, राजशिष्टाचार प्रधान सचिव डॉ. राजेश गवांदे, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे यांच्यासह न्यू साउथ वेल्सचे ट्रेझरर डॅनियल मुखी, भारतातील ऑस्ट्रेलियन उच्चायुक्त फिलिप ग्रीन, सचिव मायकल कॉट्स-ट्रॉटर, व्यापार व गुंतवणूक आयुक्त मालिनी दत्त आणि संचालक सचिन सक्सेना आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

 

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

पुण्यात युट्यूबर संतोष पंडित यांना मध्यरात्री अटक; आक्षेपार्ह व्हिडिओप्रकरणी कारवाई

Latest News

पुण्यात युट्यूबर संतोष पंडित यांना मध्यरात्री अटक; आक्षेपार्ह व्हिडिओप्रकरणी कारवाई पुण्यात युट्यूबर संतोष पंडित यांना मध्यरात्री अटक; आक्षेपार्ह व्हिडिओप्रकरणी कारवाई
पुण्यात युट्यूबर संतोष पंडित यांना कोथरूड पोलिसांनी मध्यरात्री अटक केली. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आक्षेपार्ह व्हिडिओ बनवल्याचा आरोप.
पिंपरीच्या सुपुत्राची एमपीएससीत गरुडझेप; निखिल राजगे महसूल सहाय्यकपदी
माण तालुक्यात गणेशोत्सव-उमाजी नाईक जयंती शांततेत साजरी करण्याचे आवाहन
म्हाडा रहिवाशांच्या समस्या मार्गी लावण्याचे निर्देश; सचिन अहिरांची उच्चस्तरीय बैठक
मुंबईतील वसतिगृहे-अनाथालयांची पाहणी; महिला व बालक कल्याण समितीचा आढावा

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software