- Hindi News
- पुणे
- पुण्यात युट्यूबर संतोष पंडित यांना मध्यरात्री अटक; आक्षेपार्ह व्हिडिओप्रकरणी कारवाई
पुण्यात युट्यूबर संतोष पंडित यांना मध्यरात्री अटक; आक्षेपार्ह व्हिडिओप्रकरणी कारवाई
पुण्यात युट्यूबर संतोष पंडित यांना कोथरूड पोलिसांनी मध्यरात्री अटक केली. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आक्षेपार्ह व्हिडिओ बनवल्याचा आरोप.
पुणे: पुणे शहरातील कोथरूड परिसरातील विकास कामांवरून आणि विविध मुद्यांवरून मंत्री व राजकीय नेत्यांना उघडपणे प्रश्न विचारणारे आणि आपल्या आक्रमक भूमिकेसाठी चर्चेत असणारे प्रसिद्ध युट्युबर संतोष पंडित पोलिसांच्या कचाट्यात सापडले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह, अश्लील शेरेबाजी आणि बदनामीकारक व्हिडिओ प्रसारित केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला असून, कोथरूड पोलिसांनी त्यांना मध्यरात्री त्यांच्या राहत्या घरातून अटक केली आहे. या अचानक झालेल्या कारवाईमुळे पुणे राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडिया क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
अवघ्या काही दिवसांपूर्वीच संतोष पंडित यांनी एका वाहनाच्या नंबर प्लेटवरून भाजपचे आक्रमक आमदार गोपीचंद पडळकर यांना जाहीरपणे जाब विचारला होता, त्यामुळे ते चर्चेच्या केंद्रस्थानी आले होते. त्यानंतर आता त्यांनी आपले यूट्यूब चॅनेल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून मंत्री चंद्रकांत पाटील आणि मिताली साळवेकर यांच्या विरोधात एक अत्यंत आक्षेपार्ह आणि मानहानीकारक व्हिडिओ तयार करून प्रसारित केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर आणि हजारो लोकांनी पाहिल्यानंतर या विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता.
या प्रकरणी सारिका कांबळे नावाच्या महिलेने पुढे येत कोथरुड पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली. तक्रारीची गंभीर दखल घेत कोथरूड पोलिसांनी तातडीने कायदेशीर पावले उचलली. ३ सप्टेंबर रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरी धडक देत त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी संतोष पंडित यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ७५(१)(iv), ७५(३), ३५६(२), ३५२ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या (IT Act) कलम ६७ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पहाटेच्या सुमारास झालेल्या या धडक कारवाईमुळे संपूर्ण पुणे शहरात एकच चर्चा रंगली आहे. डिजिटल माध्यमांचा गैरवापर करून राजकीय नेत्यांविषयी किंवा व्यक्तींविषयी अपमानास्पद व अश्लील टिप्पणी करणाऱ्यांवर पोलीस आता कठोर कारवाईच्या पवित्र्यात असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास कोथरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल माने यांच्याकडे सोपवण्यात आला असून, पोलीस या प्रकरणातील इतर पैलूंचाही शोध घेत आहेत.
