नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी बातमी; २९ सप्टेंबरला नाशिक-कोकणात रोजगार महाकुंभ

महाराष्ट्रात २९ सप्टेंबरला नाशिक व कोकण विभागात पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते मुंबईत उद्घाटन.

मुंबई: महाराष्ट्रातील जास्तीत जास्त युवक-युवतींना त्यांच्या पात्रता, शिक्षण आणि कौशल्यानुसार थेट रोजगाराच्या हक्काच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने कंबर कसली आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने आगामी २९ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यभरात एकाच दिवशी अत्यंत व्यापक स्वरूपात ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आदर्श आणि विकसनशील महाराष्ट्राच्या निर्मिती साठी तरुणाईला रोजगाराच्या प्रवाहात आणण्याच्या या महा अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात नाशिक आणि कोकण विभागातील जिल्ह्यांमध्ये विशेष रोजगार मेळाव्यांची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. मुंबईतील ऐतिहासिक एसएनडीटी महिला विद्यापीठात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हस्ते या महाकुंभाचा अधिकृत राज्यस्तरीय उद्घाटन सोहळा सकाळी १०:३० वाजता संपन्न होणार आहे, अशी महत्त्वाची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे.

          निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर हे रोजगार महाकुंभ मेळावे टप्प्याटप्प्याने आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात नाशिक आणि कोकण विभागातील तब्बल १२ जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबविला जात आहे. या संपूर्ण मोहिमेदरम्यान विभागातील ४१८ हून अधिक ठिकाणी विविध स्वरूपात रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्ह पार पडणार आहेत. या महामेळाव्याला राज्यासह देशभरातील नामांकित उद्योग, सेवा क्षेत्रातील आस्थापना आणि रेकूट्रूटमेंट एजन्सींचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून, आतापर्यंत दीड हजारांहून अधिक कंपन्या व नियोक्त्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे. विशेष म्हणजे, या महाकुंभासाठी एक लाखांपेक्षा अधिक इच्छुक युवक-युवतींनी ऑनलाईन व ऑफलाईन माध्यमातून आपली नोंदणी केली असून, सहभागी कंपन्यांकडून तब्बल २५ हजारांहून अधिक रिक्त पदांची मागणी आणि रोजगाराच्या संधी नोंदविण्यात आल्या आहेत. स्थानिक प्रशासन, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), महाविद्यालये आणि विविध औद्योगिक संघटनांच्या परस्पर समन्वयातून उमेदवार आणि नियोक्त्यांचे अचूक ‘कॅन्डिडेट-व्हॅकन्सी मॅचिंग’ करण्याची प्रक्रिया सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.

              या रोजगार महाकुंभाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, केवळ मेळावा भरवून थांब न राहता, मुलाखतीला सामोरे जाणाऱ्या उमेदवारांना अधिक आत्मविश्वासी आणि सक्षम बनवण्यासाठी विभागाने विशेष ‘प्री-प्लेसमेंट ट्रेनिंग ड्राइव्ह’चे यशस्वी आयोजन केले आहे. या पूर्व-प्रशिक्षण मोहिमे अंतर्गत तरुणांना व्यक्तिमत्त्व विकास, सॉफ्ट स्किल्स, प्रभावी संवाद कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य, मुलाखतीची तयारी कशी करावी आणि आधुनिक उद्योगांना अपेक्षित असणाऱ्या रोजगारक्षम कौशल्यांचे धडे तज्ज्ञ मार्गदर्शका कडून देण्यात आले आहेत. याशिवाय, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला आणि रोजगार सहभागाला विशेष प्राधान्य देण्यासाठी मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठात महिलांसाठी पूर्णपणे समर्पित असा विशेष रोजगार मेळावा व प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात आला आहे, जिथे महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराचे विविध पर्याय उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

       उद्योग क्षेत्राच्या बदलत्या गरजा आणि तरुण वर्गाची कौशल्ये यांची योग्य सांगड घालून महाराष्ट्रातील अधिकाधिक युवकांना हक्काच्या रोजगाराशी जोडणे, हा या ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र’ उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्पष्ट केले आहे. एकाच दिवशी शेकडो ठिकाणी हजारो तरुणांच्या आयुष्यात नवी दिशा देणारा हा महाकुंभ राज्यातील बेरोजगारीच्या समस्येवर मात करण्यासाठी आणि तरुणांच्या भविष्याला सुरक्षित करण्यासाठी एक मैलाचा दगड ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

 

 

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक: पुणे शहरात शस्त्रबंदीचा आदेश लागू; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

Latest News

शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक: पुणे शहरात शस्त्रबंदीचा आदेश लागू; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक: पुणे शहरात शस्त्रबंदीचा आदेश लागू; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई
पुणे: महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी पुणे पोलीस प्रशासनाने शहरात शस्त्रबंदीचा आदेश...
ई-पीक पाहणीचा अतिताण: तलाठ्यांचा जीव थोडक्यात बचावला;
नो यूपीआय डेची  देशभर हाक; प्रस्तावित एमडीआर शुल्का विरोधात व्यापारी आक्रमक, २ ऑक्टोबरला क्यूआर कोड झाकून निषेध
पुण्यात घरगुती गणपतींच्या विसर्जनाला सुरुवात; कृत्रिम व खुल्या हौदांवर भाविकांची मोठी गर्दी
गणेश विसर्जन मिरवणुकीत अन्नभेसळी विरोधात जनजागृती; ३०० विद्यार्थ्यांची अनोखी रांगोळी ठरली आकर्षण

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software