- Hindi News
- पुणे
- शेतकऱ्यांच्या व्यथा अन् दुष्काळाचे वास्तव; ‘केसरीवाडा गणपती’चा सामाजिक संदेश
शेतकऱ्यांच्या व्यथा अन् दुष्काळाचे वास्तव; ‘केसरीवाडा गणपती’चा सामाजिक संदेश
पुण्यातील मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत शेतकऱ्यांच्या व्यथा व दुष्काळाचे वास्तव मांडणाऱ्या सामाजिक देखाव्याने पुणेकरांचे लक्ष वेधले.
पुणे : अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत मानाच्या गणपतींच्या दिमाखदार सहभागासोबतच सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारे देखावेही पुणेकरांचे लक्ष वेधून घेत आहेत. मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती यंदा बळीराजाच्या व्यथा आणि दुष्काळाचे वास्तव मांडणाऱ्या सामाजिक देखाव्यामुळे विशेष चर्चेत राहिला. मंडई चौकातून सुरू झालेली मानाच्या गणपतींची मिरवणूक लक्ष्मी रस्त्याने विसर्जनासाठी मार्गस्थ झाली. ढोल-ताशांच्या गजरात आणि गणपती बाप्पाच्या जयघोषात हजारो गणेशभक्त सहभागी झाले होते. याचवेळी केसरीवाडा गणपतीच्या देखाव्याने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोरील दुष्काळाचे संकट, शेतीसाठी घेतलेले कष्ट, आर्थिक अडचणी आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचे प्रभावी चित्रण या देखाव्यात करण्यात आले. विविध धान्ये, फळबागा आणि डोलणाऱ्या उसाच्या शेतीच्या प्रतिकृतींच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्राचे वास्तव पुण्याच्या रस्त्यावर साकारण्यात आले.
अन्नदाता असलेल्या बळीराजाच्या आयुष्यातील संकटे दूर होऊन पुन्हा समृद्धीचे दिवस यावेत, असा भावनिक संदेश या देखाव्यातून देण्यात आला. गणेशोत्सवाच्या परंपरेसोबत सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केसरीवाडा गणेशोत्सव मंडळाने या माध्यमातून केला. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परंपरेचा वारसा जपत सामाजिक प्रश्नांना व्यासपीठ देणारा हा देखावा पुणेकरांसाठी विचार करायला लावणारा ठरला. देखावा पाहण्यासाठी लक्ष्मी रस्त्यावर मोठी गर्दी झाली असून, केसरीवाडा गणपतीच्या या सामाजिक संदेशाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
