- Hindi News
- पुणे
- वाघोलीत ३५ वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या; आधी कारने धडक, नंतर लोखंडी पाईपने हल्ला, ८ जण गजाआड
वाघोलीत ३५ वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या; आधी कारने धडक, नंतर लोखंडी पाईपने हल्ला, ८ जण गजाआड
पुण्यातील वाघोलीत अनैतिक संबंधांच्या संशयातून ३५ वर्षीय नवनाथ सोन्नर यांची हत्या. वाघोली पोलिसांनी मुख्य आरोपीसह ८ जणांना केली अटक.
पुणे : वाघोली परिसरात अनैतिक संबंधांच्या संशयातून एका ३५ वर्षीय व्यक्तीची कारने धडक देऊन आणि त्यानंतर लोखंडी पाईपने मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी (२४ सप्टेंबर) रात्री वाघोली येथील बाजारतळ मैदान परिसरात हा प्रकार घडला. या प्रकरणी वाघोली पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे.
नवनाथ दिगंबर सोन्नर (वय ३५, रा. चौधरी वस्ती, खराडी, पुणे) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी नामदेव बाळासाहेब आळनुरे याच्या नातेसंबंधातील एका महिलेशी नवनाथ सोन्नर यांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपींना होता. याच कारणातून आरोपींच्या मनात सोन्नर यांच्याबद्दल राग होता.
वाघोलीतील बाजारतळ मैदानात हल्ला
गुरुवारी, २४ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आरोपी वाघोली येथील बाजारतळ मैदान परिसरात एकत्र आले. तेथे त्यांनी नवनाथ सोन्नर यांना गाठले.आरोपींनी स्विफ्ट कारने सोन्नर यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर ते जमिनीवर कोसळले. त्यानंतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी पाईपने त्यांच्या डोक्यावर गंभीर वार केले. या हल्ल्यात सोन्नर यांचा मृत्यू झाला.
पोलिसांकडून आठ आरोपींना अटक
घटनेची माहिती मिळाल्या नंतर वाघोली पोलिसांनी तपास सुरू केला. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये नामदेव बाळासाहेब आळनुरे (२९, रा. वाकलगाव, ता. गंगाखेड, जि. परभणी), कैलास सुधाकर होरे (३२, रा. चौधरी वस्ती, खराडी बायपास, पुणे), बालाजी सोनाजी घनवटे (२२, रा. वाकलगाव, ता. गंगाखेड, जि. परभणी), अनिल सोपान घनवटे (२९, रा. आव्हाळवाडी, ता. हवेली, जि. पुणे), नितीन लक्ष्मण उमाप (२१, रा. काळुबाई नगर, वाघोली), रोहन रामचंद्र वाघमारे (२२, रा. येरवडा), अजित शिवाजी राठोड (२३, रा. गणेशनगर, वाघोली) आणि अर्जुन ज्ञानेश्वर शेलार (२०, रा. भावडी रोड, वाघोली) यांचा समावेश आहे.
हत्येप्रकरणी गुन्हा दाखल
या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६५६/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), ११५(२), ३५१(२), १८९(२)(४), १९० आणि १९१(१)(३) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शहादेव हवाले करीत आहेत. हत्येचा संपूर्ण घटनाक्रम, आरोपींची नेमकी भूमिका आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वाहनासह इतर बाबींचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
