- Hindi News
- पुणे
- एरंडवणेत दरोड्याचा डाव पोलिसांनी उधळला; पाच जण हत्यारांसह ताब्यात
एरंडवणेत दरोड्याचा डाव पोलिसांनी उधळला; पाच जण हत्यारांसह ताब्यात
पुण्यात गणेशोत्सवाच्या बंदोबस्ता दरम्यान डेक्कन पोलिसांनी एरंडवणे येथे दरोड्याचा डाव उधळला. धारदार हत्यारांसह ५ आरोपींना अटक करण्यात आली.
पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात पोलिसा कडून गस्त आणि बंदोबस्त वाढविण्यात आला असताना डेक्कन पोलिसांनी एरंडवणे परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना पकडले. संशयितां कडून धारदार हत्यारे, लाल तिखटाची पावडर आणि दरोड्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. एरंडवणे येथील अचानक मित्र मंडळ (चावडी) परिसरात काही जण संशयास्पद रीत्या एका इमारतीत थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस अंमलदार सचिन गायकवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार, दोन मजली इमारतीच्या वरच्या मजल्यावर सहा ते सात जण हत्यारे घेऊन थांबले असल्याचे समोर आले.
माहिती मिळताच डेक्कन पोलिसांच्या पथकाने संबंधित ठिकाणी धाव घेतली. इमारतीच्या वरच्या मजल्यावर जाऊन पोलिसांनी दरवाजा उघडण्यास सांगितले. त्यावेळी आत पाच जण आढळून आले. पोलिसांनी झडती घेतली असता टेबलवर धारदार हत्यारे, लाल तिखटाची पावडर तसेच अन्य साहित्य आढळले. त्यामुळे दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून पाचही जणांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी रितेश गुरुनाथ चिप्पा (२५, गंजपेठ), विकास नितीन लांबोर (१९, खिलारेवाडी), प्रतिक हनुमंत कांबळे (१९, एरंडवणे), प्रतिक रामचंद्र कदम ऊर्फ बाबु (२३, खिलारेवाडी) आणि सुजल मनोज मोरे (१९, इंदिरानगर, बिबवेवाडी) यांना अटक केली आहे.
या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१०(४), शस्त्र कायदा कलम ४ (२५) तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम ३७(१) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींचा अन्य कोणत्या गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का, याबाबतही पोलीस तपास करीत आहेत. ही कारवाई पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावळे आणि विश्रामबाग विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला, पोलीस निरीक्षक रणजितसिंग परदेशी आणि सपना देवतळे यांच्या सूचनेनुसार पोलीस पथकाने ही कारवाई केली.
