दिव्यांगांसाठी रोजगार, आरोग्य अन् शिक्षणाला प्राधान्य; मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय

नागपुरात 'जयपूर फूट' शिबिरात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्यांगांसाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या. मानधनात वाढ, घरकुल योजनेत प्राधान्य आणि UDID कार्ड सोपे करण्याचे निर्देश.

नागपूर: दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना स्वावलंबी व सक्षम बनवण्यासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध आहे. दिव्यांग व्यक्तींना आवश्यक ती सर्व सहाय्यक साधने उपलब्ध करून देण्या बरोबरच रोजगार, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात त्यांना प्राधान्य दिले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नागपूर येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात अस्थिव्यंग व कर्णबधिर दिव्यांग व्यक्तींसाठी आयोजित निःशुल्क ‘जयपूर फूट’ साहित्य आणि सहाय्यक साधने मोजमाप व वाटप शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

      मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष संकल्पनेतून आणि नागपूर महानगरपालिका, भगवान महावीर विकलांग सहायता समिती (जयपूर), जिल्हा परिषद नागपूर तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या शिबिराला दिव्यांग नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला असून, या माध्यमातून अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडत असल्याचा आनंद मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड, आमदार संजय भेंडे, आ. राजीव पोतदार, आ. कृपाल तुमाने, आमदार चरणसिंग ठाकूर, आ. मोहन मते, मनपा सत्तापक्ष नेते नरेंद्र बोरकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

      कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार सोबतच राज्य शासना कडूनही दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी अनेक प्रभावी पावले उचलली जात आहेत. दिव्यांगांचे मानधन वाढवून ते २,५०० रुपये करण्यात आले असून, घरकुल योजना आणि इतर महत्त्वाच्या शासकीय योजनां मध्येही त्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. ‘विकलांग’ या शब्दाऐवजी ‘दिव्यांग’ असा संवेदनशील आणि सकारात्मक दृष्टिकोन अंगीकारून त्यांच्या उपजत क्षमतांना योग्य वाव व संधी देणे आपली सामूहिक जबाबदारी आहे. दिव्यांग व्यक्तींच्या सोयीसाठी आणि त्यांना योजनांचा लाभ जलद मिळण्यासाठी UDID कार्डची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी झोन निहाय कामकाज करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले. भगवान महावीर विकलांग सहायता समिती १९७५ पासून दिव्यांगांच्या सेवेत कार्यरत असून ‘जयपूर फूट’च्या माध्यमातून त्यांच्या जीवनात क्रांती घडवत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

    या कार्यक्रमा दरम्यान भगवान महावीर विकलांग सहायता समितीचे पी. आर. मेहता यांच्यासह उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच, आकर्षक ‘तिरंगा वंदे मातरम’ प्रदर्शनाचे उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या शिबिरामुळे नागपूर जिल्ह्यातील शेकडो दिव्यांग व्यक्तींच्या दैनंदिन जीवनातील अडचणी दूर होऊन ते अधिक आत्मविश्वासाने आणि स्वावलंबनाने आपले आयुष्य जगण्यास सक्षम होणार आहेत.

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

जावळीत मतदारांची ‘सहल’; जिल्हा बँक निवडणुकीत शशिकांत शिंदेंसमोर तगडे आव्हान

Latest News

जावळीत मतदारांची ‘सहल’; जिल्हा बँक निवडणुकीत शशिकांत शिंदेंसमोर तगडे आव्हान जावळीत मतदारांची ‘सहल’; जिल्हा बँक निवडणुकीत शशिकांत शिंदेंसमोर तगडे आव्हान
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत जावळीत राजकीय पेच. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे ३२ मतदार सहलीवर; शशिकांत शिंदेंच्या अडचणीत वाढ....
ब्लिंकिटच्या गोदामात अस्वच्छता; एफडीएकडून परवाना निलंबित
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! आज तिरंगा रॅलीनिमित्त शहरातील वाहतुकीत मोठे बदल; दुपारपासून 'हे' मार्ग राहणार बंद
पिंपरी-चिंचवडमध्ये खड्ड्यांवर आयुक्तांचा दणका; ४८ तासांत बुजवण्याचे आदेश
पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; चार तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software