- Hindi News
- पुणे
- ‘ग्लोबल गुरुजी’ निवड प्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्ण; १,१८७ शिक्षक परीक्षेत सहभागी
‘ग्लोबल गुरुजी’ निवड प्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्ण; १,१८७ शिक्षक परीक्षेत सहभागी
पुण्यातील 'ग्लोबल गुरुजी' उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात १,१८७ शिक्षकांचा सहभाग. सिंगापूरच्या शिक्षण पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी ५० शिक्षकांची होणार निवड.
पुणे: पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी ‘ग्लोबल गुरुजी’ उपक्रमाला जिल्हाभरातील शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. या उपक्रमांतर्गत शिक्षकांच्या निवड प्रक्रियेचा पहिला टप्पा नुकताच पार पडला असून, जिल्ह्यातील १३ परीक्षा केंद्रांवर तब्बल १,१८७ शिक्षकांनी निवड परीक्षेत सहभाग घेतला आहे. या पारदर्शक निवड प्रक्रियेतून अखेर ५० उत्कृष्ट शिक्षकांची निवड केली जाणार असून, त्यांना सिंगापूर येथील प्रगत शिक्षण व्यवस्थेचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
पुणे जिल्हा परिषदेने आगामी आर्थिक वर्षासाठी हा विशेष ‘ग्लोबल गुरुजी’ उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे जिल्ह्यातील ५० गुणी शिक्षकांना परदेशातील अत्याधुनिक शिक्षण पद्धतींचा जवळून अभ्यास करण्यासाठी पाठविण्यात येणार आहे. आधुनिक अध्यापन तंत्र, विद्यार्थी केंद्रित शिक्षण प्रणाली, डिजिटल साधनांचा प्रभावी वापर, कौशल्य आधारित शिक्षण आणि शाळा व्यवस्थापनातील नाविन्यपूर्ण पद्धती यांचा प्रत्यक्ष अनुभव शिक्षकांना मिळावा, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. याद्वारे सिंगापूरच्या जागतिक दर्जाच्या सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेचा सखोल अभ्यास करून तो पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळांमध्ये राबवण्यास मोठी मदत होणार आहे.
शिक्षकांची निवड करताना विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील प्रगती, वर्गातील नावीन्यपूर्ण उपक्रम, विविध शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षांमधील विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी तसेच शाळेच्या सर्वांगीण प्रगतीत संबंधित शिक्षकांचे बहुमूल्य योगदान, या कडक निकषांवर ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेला १,१८७ शिक्षकांनी मोठ्या उत्साहाने हजेरी लावली. यातून शॉर्टलिस्ट होणाऱ्या शिक्ष पुढील फेऱ्यांसाठी पात्र ठरवले जाणार आहेत.
परदेशातील अभ्यास दौरा पूर्ण करून परतल्यानंतर अंतिम निवड झालेले हे ५० शिक्षक ‘टीचर इनोव्हेशन फेलोज’ (Teacher Innovation Fellows) म्हणून जिल्ह्यात कार्य करणार आहेत. हे शिक्षक जिल्ह्यातील इतर शाळांमधील शिक्षकांसाठी प्रात्यक्षिक वर्ग घेतील, विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करतील आणि इतर शिक्षकांना मार्गदर्शन करतील. परिणामी, ५० शिक्षकांनी घेतलेला परदेशातील ज्ञानाचा आणि अनुभवाचा ठेवा जिल्ह्यातील अन्य शिक्षक व विद्यार्थ्यांपर्यंत यशस्वीपणे पोहोचवला जाईल. या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शैक्षणिक गुणवत्तेला एक नवी आणि आधुनिक दिशा मिळण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
