- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- महिला सुरक्षेला बळ; सांगलीत ‘हिरकणी कक्ष’ आणि दामिनी पथकाच्या ई-बाईक्सचे लोकार्पण
महिला सुरक्षेला बळ; सांगलीत ‘हिरकणी कक्ष’ आणि दामिनी पथकाच्या ई-बाईक्सचे लोकार्पण
सांगलीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते २० अत्याधुनिक हिरकणी कक्ष आणि दामिनी पथकाच्या ६ ई-बाईक्सचे लोकार्पण. महिला सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे पाऊल.
सांगली: महिला सुरक्षितता आणि त्यांच्या सक्षमी करणास राज्य शासनाकडून सदैव सर्वोच्च प्राधान्य दिले जात असून, याच संकल्पनेतून सांगली जिल्ह्यात महत्त्वपूर्ण सुविधांची भर पडली आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सांगलीत जिल्हा नियोजन समितीच्या (DPC) निधीतून उभारण्यात आलेल्या ‘हिरकणी कक्ष’ तसेच पोलीस दलास भेटस्वरूपात प्राप्त झालेल्या दामिनी पथकाच्या ६ आधुनिक ई-बाईक्सचे दिमाखात लोकार्पण करण्यात आले. पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या या विशेष कार्यक्रमास आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वर्षा पाटील, तसेच पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह पोलीस व महिला-बालविकास विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विशेष सूचनेनुसार महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजनेच्या ३ टक्के राखीव निधीतून सांगली जिल्ह्यात तब्बल २० ठिकाणी अत्याधुनिक आणि बंदिस्त ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यात आले आहेत. यासाठी एकूण २ कोटी १२ लाख १८ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये पोलीस विभागाच्या माध्यमातून सांगली पोलीस अधीक्षक कार्यालय, सांगली शहर पोलीस ठाणे, मिरज शहर पोलीस ठाणे, जत, तासगाव, विटा, आटपाडी, कडेगाव, पलूस, इस्लामपूर आणि महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज येथे ११ कक्ष उभारण्यात आले आहेत. तर परिवहन विभागाच्या माध्यमातून जत, इस्लामपूर, आष्टा, तासगाव, कवठेमहांकाळ, कडेपूर, कडेगाव, खानापूर आणि पलूस येथे ९ कक्ष तयार करण्यात आले असून, या सर्व कक्षांचे प्रातिनिधिक लोकार्पण यावेळी करण्यात आले. शासकीय कार्यालयांमध्ये दैनंदिन कामासाठी येणाऱ्या गरोदर महिला तसेच स्तनदा मातांना सुरक्षित व हक्काच्या वातावरणात स्तनपान करता यावे, महिलांना हक्काची विश्रांती घेता यावी आणि किशोरवयीन मुलींना नैसर्गिक ऋतुचक्राच्या काळात आवश्यक व सुरक्षित सुविधा उपलब्ध व्हावी, हा या मागचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
या कार्यक्रमात महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या पोलीस विभागाच्या ‘दामिनी पथकाला’ अधिक सक्षम बनवण्यासाठी ६ ई-बाईक्स भेट देण्यात आल्या. या अत्याधुनिक ई-बाईक्समुळे गर्दीच्या ठिकाणी, बाजारपेठांमध्ये आणि संवेदनशील भागांमध्ये महिला सुरक्षेशी संबंधित तक्रारींवर दामिनी पथकाला अधिक वेगाने घटनास्थळी पोहोचणे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमासाठी शहरातील विविध संस्था व मान्यवरांनी मोठा सहभाग नोंदवला असून, परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट, मिरजचे डॉ. विनोद परमशेट्टी, उषःकाल हॉस्पिटलचे सचिव डॉ. मिलिंद पारेख, महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील यांनी या ई-बाईक्स प्रायोजित केल्या आहेत. तसेच, सिद्धी शोरूमचे श्रीकांत तारळेकर यांच्याकडून प्रत्येक बाईकमागे १५ हजार रुपयांची सवलत देण्यात आली असून, सहा हेल्मेटही भेट देण्यात आले आहेत. या सर्व उल्लेखनीय सहकार्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सर्व प्रायोजकांचा सत्कार करण्यात आला. या नवीन उपक्रमांमुळे सांगली जिल्ह्यातील महिलांना आणि माता-भगिनींना मोठा दिलासा मिळणार असून, सुरक्षा व्यवस्थेला अधिक बळ मिळणार आहे.
