- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- तोरणमाळच्या जागतिक दर्जाच्या पर्यटन विकासाला गती; मंत्री शंभूराज देसाईंचे निर्देश
तोरणमाळच्या जागतिक दर्जाच्या पर्यटन विकासाला गती; मंत्री शंभूराज देसाईंचे निर्देश
नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळच्या जागतिक दर्जाच्या शाश्वत व पर्यावरणपूरक पर्यटन विकास आराखड्याबाबत मुंबईत उच्चस्तरीय बैठक पार पडली.
मुंबई: सातपुड्याच्या कुशीत वसलेले निसर्गरम्य तोरणमाळ हे ठिकाण लवकरच जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यात येणार आहे. तोरणमाळचा पर्यटन विकास अत्यंत शाश्वत, नियोजनबद्ध आणि पूर्णपणे पर्यावरणपूरक पद्धतीने केला जाईल. या प्रक्रियेत तेथील मूळ नैसर्गिक वारसा जपतानाच पर्यटकांसाठी आधुनिक व दर्जेदार सुविधा निर्माण करण्यावर राज्य शासनाचा विशेष भर राहील, असे प्रतिपादन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.
तोरणमाळ पर्यटन विकास आराखड्या बाबत केंद्र शासनाकडे सादर करण्यात येणाऱ्या सुधारित व सर्वंकष प्रस्तावाच्या अनुषंगाने एक उच्चस्तरीय आढावा बैठक पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहात पार पडली. या महत्त्वपूर्ण बैठकीस आमदार आमश्या पाडवी, आमदार चंद्रकांत रघुवंशी, पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (MTDC) व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे, पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे, पर्यटन विभागाचे उपसचिव संतोष रोकडे, सहसंचालक संतोष जाधव, सहायक संचालक रवींद्र पवार, कार्यकारी अभियंता आकाश चकोर यांच्यासह नंदुरबारचे जिल्हाधिकारी आणि नाशिक पर्यटन विभागाचे उपसंचालक दूरदृश्य प्रणालीद्वारे (Online) उपस्थित होते.
बैठकीत तोरणमाळ पर्यटन विकास आराखड्याशी संबंधित विविध विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तोरणमाळचा पर्यटन विकास अधिक नियोजनबद्ध आणि दर्जेदार व्हावा, यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (MTDC) मालकीच्या ११ हेक्टर ५६ आर जागेची तातडीने मोजणी करून तिची अचूक चतुःसीमा निश्चित करण्याचे निर्देश नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. तसेच, एमटीडीसीच्या नाशिक विभागातील अधिकाऱ्यांनी या कामाचा आवश्यक पाठपुरावा करून संबंधित जागेचे नकाशे व चतुःसीमा एका महिन्याच्या आत निश्चित करावेत, असे सक्त निर्देश पर्यटन मंत्री देसाई यांनी दिले.
तोरणमाळचा अद्वितीय नैसर्गिक ठेवा, समृद्ध जैववैविध्य आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा वारसा कोणत्याही प्रकारे बाधित न करता आधुनिक सुविधांचा विकास करण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक पर्यटन, दर्जेदार पायाभूत सुविधा आणि जगभरातून पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण घटकांचा समावेश या पर्यटन विकास आराखड्यात करण्यात यावा, अशा स्पष्ट सूचना बैठकीत देण्यात आल्या. केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणारा हा प्रस्ताव अत्यंत परिपूर्ण, प्रभावी आणि भविष्यातील पर्यटन विकासाच्या गरजा ओळखून सक्षम असावा, यादृष्टीने यंत्रणेने काम करावे, असे निर्देशही मंत्र्यांनी दिले आहेत. या प्रकल्पामुळे नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे झळकणार असून स्थानिक स्तरावर रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे.
