- Hindi News
- सातारा
- गटशेती ही सामाजिक चळवळ व्हायला हवी : डॉ. अविनाश पोळ
गटशेती ही सामाजिक चळवळ व्हायला हवी : डॉ. अविनाश पोळ
पानी फाउंडेशन फार्मर कप २०२६ अंतर्गत माण तालुक्यातील शेतकरी गटांचा पिंपरी येथे मेळावा. डॉ. अविनाश पोळ यांनी गटशेतीचे महत्त्व स्पष्ट केले.
दहिवडी: "पानी फाउंडेशनच्या माध्यमातून माण तालुक्यात गटशेतीची चळवळ वेगाने बहरत असून गावांचे अर्थकारण बदलण्याची ताकद या उपक्रमात आहे. त्यामुळे गटशेती ही केवळ शेती पद्धती न राहता एक सामाजिक चळवळ व्हायला हवी," असे प्रतिपादन पाणी फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ यांनी केले.
पिंपरी येथे 'यशवंत शेतकरी गट' यांच्या वतीने आयोजित 'पानी फाउंडेशन फार्मर कप स्पर्धा २०२६' अंतर्गत सहभागी शेतकरी गटांच्या संवाद व मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. माण तालुक्यातील सर्व शेतकरी गटांचा हा मेळावा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
आपल्या मार्गदर्शनात डॉ. पोळ पुढे म्हणाले की, "गटशेतीमुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, सामूहिक नियोजन आणि उत्पन्न वाढीचा मोठा लाभ मिळत आहे. ज्या गावांनी अद्याप या उपक्रमात सहभाग घेतला नाही, त्यांनीही पुढे येऊन गटशेतीचा भाग व्हावे."
या मेळाव्यात कृषी अधिकारी वैभव लिंगे व विभागीय समन्वयक सुखदेव भोसले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.मार्गदर्शनाचे प्रमुख मुद्दे: मेळाव्यादरम्यान शेतकऱ्यांना गटशेतीचे महत्व, आधुनिक शेती पद्धती, जलसंधारण, पीक व्यवस्थापन आणि फार्मर कप स्पर्धेची सविस्तर माहिती देण्यात आली.
सहभागी शेतकरी गटांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या शेतीविषयक विविध शंकांचे निरसन करण्यात आले.मेळाव्यात फार्मर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व शेतकरी गटांचा सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला डॉ. अविनाश पोळ, विभागीय समन्वयक सुखदेव भोसले, कृषी अधिकारी वैभव लिंगे, जयदीप बनसोडे, उमेद अभियानाचे शंकर नरबट, सुनील काळे, जितेंद्र फडतरे तसेच माजी सरपंच चंद्रकांत शिलवंत यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक चंद्रकांत शिलवंत यांनी केले, तर उपस्थितांचे आभार नेताजी राजगे यांनी मानले.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी 'यशवंत शेतकरी गट' व 'राजमाता अहिल्यादेवी महिला शेतकरी गट' मधील सर्व सभासद व शेतकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या मेळाव्याच्या माध्यमातून सामूहिक शेतीद्वारे उत्पादन वाढवणे, उत्पादनावरील खर्चात बचत करणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्याचा मोलाचा संदेश शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला.
