- Hindi News
- सातारा
- बेशिस्त वाहनचालकांना दहिवडी पोलिसांचा दणका ; फॅन्सी नंबरप्लेट, सायलेन्सर आणि विना सीटबेल्ट चालकांवर
बेशिस्त वाहनचालकांना दहिवडी पोलिसांचा दणका ; फॅन्सी नंबरप्लेट, सायलेन्सर आणि विना सीटबेल्ट चालकांवर कारवाई
४७ वाहनांवर गुन्हे दाखल; ३६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल
दहिवडी शहर व परिसरातील बेशिस्त वाहनचालकांवर पोलिसांची मोठी कारवाई. ४७ वाहनांवर गुन्हे दाखल करून ३६,५०० रुपयांचा दंड वसूल.
दहिवडी : दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीत वाढते अपघात आणि बेशिस्त वाहन चालवण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी शहरात विशेष मोहीम राबवून धडक कारवाई केली. दिनांक १ ऑगस्ट ते ३ ऑगस्ट २०२६ दरम्यान राबवलेल्या या मोहिमेत कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर, फॅन्सी नंबर प्लेट आणि विना सीटबेल्ट वाहन चालवणाऱ्या ४७ वाहन चालकांवर धडक कारवाई करत एकूण ३६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दहिवडी शहरातील फलटण चौक आणि एसटी स्टँड परिसरात दहिवडी पोलिसांनी सापळा रचून विशेष तपासणी मोहीम राबवली. या कारवाईमुळे बेशिस्त वाहनधारकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
सदर कारवाई सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक मा. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. रणजित सावंत यांच्या मार्गदर्शना खाली सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश हांगे, पोलीस हवालदार रवींद्र खाडे, रामचंद्र गाढवे, महिला पोलीस हवालदार निलम रासकर, ट्रॅफिक पोलीस कॉन्स्टेबल सहदेव साबळे, गणेश खाडे, सागर लोखंडे, हांगे, अजिनाथ नरबट, मल्हारी खाडे आणि किरण हिरवे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
अल्पवयीन दुचाकीस्वारांच्या पालकांवर होणार कारवाई:
"वाहतुकीचे नियम हे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीच बनवले आहेत. कर्णकर्कश आवाजाच्या सायलेन्सरमुळे रुग्ण, वृद्ध व लहान मुलांना त्रास होतो, तसेच फॅन्सी नंबरप्लेटमुळे गुन्हेगारीस खतपाणी मिळते. सर्व वाहन चालकांनी नियमांचे तंतोतंत पालन करावे आणि पोलीस प्रशासनास सहकार्य करावे.तसेच अल्पवयीन मुलांना वाहन चालवीण्यास दिल्यास त्यांच्या पालकांवर कारवाई करण्यात येईल.
— भाऊसाहेब गोसावी (सहायक पोलीस निरीक्षक, दहिवडी)
