- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- कोपरगावच्या पाणीपुरवठा योजनांचा गुलाबराव पाटीलांकडून आढावा
कोपरगावच्या पाणीपुरवठा योजनांचा गुलाबराव पाटीलांकडून आढावा
मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत कोपरगाव व राहाता तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांची उच्चस्तरीय बैठक पार पडली.
मुंबई: कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील विविध प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या कामांचा सविस्तर आढावा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्रालयात आयोजित एका विशेष उच्चस्तरीय बैठकीत घेतला. या बैठकीस आमदार आशुतोष काळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव रंगा नायक, जल जीवन मिशनच्या सह अभियान संचालक दिपाली देशपांडे यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, राज्यातील पाणीपुरवठा योजनांची सर्व प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावून स्थानिक नागरिकांना शाश्वत, शुद्ध व दर्जेदार पिण्याच्या पाण्याचा पुरेसा लाभ मिळवून देणे हे शासनाचे प्राधान्य आहे. ज्या पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण झाली आहेत, त्याबद्दलचा अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधितांकडून सविस्तर आढावा घ्यावा, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच, ज्या योजनांचे सुधारित प्रशासकीय मान्यतेचे (Revised Administrative Approval) प्रस्ताव प्रलंबित आहेत, ते त्वरित शासनाकडे पाठवावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ज्या पाणीपुरवठा योजनांचे काम मूळ अंदाज पत्रकानुसार (Original Estimate) पूर्ण झाले आहे, परंतु काही तांत्रिक कारणास्तव किंवा लहान मोठ्या कामांसाठी अतिरिक्त छोट्या रकमेची गरज भासत आहे, अशा योजनांच्या कामांसाठी जिल्हा नियोजन समिती मधून (DPDC) निधी उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मंत्र्यांनी यावेळी दिली.
या उच्चस्तरीय बैठकीमध्ये कोपरगाव आणि राहाता तालुक्यातील अनेक महत्त्वपूर्ण पाणीपुरवठा योजनांच्या प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली व त्याबाबतचे निर्णय घेण्यात आले:
- कोपरगाव तालुका: कोळपेवाडी, कुंभारी, मायगाव देवी, सुरेगाव, मळेगाव थडी, धारणगाव, रवंदे, रांजणगाव देशमुख, शिंगणापूर, वारी कान्हेगाव, तसेच कोकमठाण येथील पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक जागा संपादन आणि मंजुरीचा विषय.
- राहाता तालुका: रुई-शिंगवे, पुणतांबा आणि नपावाडी येथील जल जीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत चर्चा.
- वाढीव प्रस्ताव: माहेगाव देशमुख (ता. कोपरगाव) येथील जल जीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेच्या वाढीव प्रस्तावाला मंजुरी देण्याच्या मुद्द्यावरही या बैठकीत गांभीर्याने विचार विनिमय करण्यात आला.
या सर्व योजनांमुळे कोपरगाव मतदार संघातील ग्रामीण भागाचा आगामी काळातील पाणीप्रश्न कायम स्वरूपी सुटण्यास मोठी मदत होणार असून, नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी भटकंती थांबणार आहे.
