- Hindi News
- पुणे
- दूध भेसळ प्रकरणाला नवे वळण; देवदत्त निकम यांच्या समर्थनार्थ समर्थक आक्रमक
दूध भेसळ प्रकरणाला नवे वळण; देवदत्त निकम यांच्या समर्थनार्थ समर्थक आक्रमक
देवदत्त निकम यांच्यावरील जमीन खरेदीचे आरोप त्यांच्या समर्थकांनी फेटाळले. दूध भेसळ प्रकरणावरून लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न असल्याचा मंचरमधील पत्रकार परिषदेत दावा.
मंचर : दूध भेसळ प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांच्यावर विरोधकांनी केलेले आरोप त्यांच्या समर्थकांनी फेटाळून लावले आहेत. मंचर (ता. आंबेगाव) येथे आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हा सर्व प्रकार दूध भेसळ प्रकरणावरून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा आणि मूळ मुद्दा भरकटवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आंबेगाव तालुका युवक अध्यक्ष गणेश यादव यांनी सांगितले की, देवदत्त निकम यांनी दूध भेसळ प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करून हा विषय प्रभावीपणे मांडला आहे. त्यामुळेच त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्यासाठी बिनबुडाचे आरोप करण्यात येत असल्याचा दावा त्यांनी केला.
निकम यांनी विधानसभा निवडणुकीनंतर साडेपाच एकर शेतजमीन खरेदी केल्याचा आरोप करत या व्यवहाराची आयकर विभागाकडे तक्रार करण्याची घोषणा विरोधकांपैकी प्रभाकर बांगर यांनी केली होती. या आरोपांना उत्तर देताना यादव म्हणाले की, निकम यांनी स्वतःच्या मालकीची विविध ठिकाणची सुमारे १३ एकर शेतजमीन विकून त्यातून मिळालेल्या रकमेच्या आधारे नागापूर येथे साडेपाच एकर जमीन खरेदी केली आहे.
"जर त्यांच्याकडे बेकायदेशीर पैसा असता, तर स्वतःची जमीन विकण्याची गरजच पडली नसती," असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच, शेतीच्या उत्पन्नाची नोंद निकम यांनी आपल्या आयकर विवरणपत्रात (आयटीआर) कायदेशीररीत्या केली असून, ही संपत्ती त्यांच्या कष्टातून उभी राहिल्याचा दावाही त्यांनी केला.
यावेळी विरोधकांवरही पलटवार करत यादव यांनी २०२४ मध्ये निकम यांच्या खात्यातून प्रभाकर बांगर यांच्या खात्यावर २० हजार रुपयांचा व्यवहार झाल्याचा उल्लेख केला आणि त्या व्यवहाराबाबत बांगर यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली. तसेच विधानसभा निवडणुकीच्या काळात तालुका अध्यक्ष धोंडिभाऊ भोर यांच्याकडूनही पैसे घेतल्याचा आरोप त्यांनी बांगर यांच्यावर केला.
पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कोणताही हल्ला केला नसून, उलट कार्यकर्त्यांनीच बांगर यांच्या मदतीसाठी धाव घेतल्याचा दावा करण्यात आला. तसेच उपस्थित असलेले विशाल वाबळे यांनीही प्रभाकर बांगर यांनी केलेले सर्व आरोप निराधार असल्याचे सांगत ते फेटाळून लावले.
दरम्यान, या आरोप-प्रत्यारोपांमुळे दूध भेसळ प्रकरणाला आता राजकीय रंग चढला असून, पुढील काळात या वादावर आणखी प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
