- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- मुंबई राजभवनात विश्वविजेत्या अंध महिला क्रिकेटपटूंचा गौरव सोहळा
मुंबई राजभवनात विश्वविजेत्या अंध महिला क्रिकेटपटूंचा गौरव सोहळा
भारतीय अंध महिला क्रिकेट संघाचा मुंबई राजभवनात राज्यपाल जिष्णु देव वर्मा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सत्कार. 'देख ले ! इंडिया' माहितीपटाचे प्रदर्शन.
मुंबई: अंध महिलांच्या टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरत देशाचा मान उंचावणाऱ्या भारतीय अंध महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या विश्वविजेत्या सदस्यांचा राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते मुंबईतील राजभवनात एका विशेष कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. भारतीय अंध महिला क्रिकेट संघाच्या आणि खेळाडूंच्या संघर्षमय व प्रेरणादायी प्रवासावर आधारित ‘देख ले ! इंडिया’ या माहितीपटाच्या विशेष प्रदर्शना निमित्त या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या दिमाखदार सोहळ्याला राज्याचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्यासह उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, मुंबईच्या महापौर रितु तावडे, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. उज्ज्वला चक्रदेव, क्रिकेट असोसिएशन फॉर ब्लाइंड इन इंडियाचे अध्यक्ष डॉ. महांतेश जी. के., संघाच्या प्रशिक्षिका शिखा शेट्टी यांच्यासह विविध दिव्यांग शाळा व संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले की, काही दिवसांपूर्वी आपण या माहितीपटाचा ट्रेलर पाहिला होता. हा माहितीपट केवळ एखाद्या क्रिकेट संघाच्या विजयाची गाथा नसून, दिव्यांग महिला खेळाडूंमोरील सामाजिक व आर्थिक आव्हाने, त्यांच्या कुटुंबाच्या जबाबदारीची भावना, समानतेसाठी त्यांनी दिलेला लढा आणि अहोरात्र परिश्रमातून मिळवलेल्या विजयाचे अत्यंत सजीव चित्रण आहे. अंध महिला क्रिकेटपटूंनी केवळ विश्वचषकच जिंकला नाही, तर देशातील करोडो भारतीयांचे मन जिंकले आहे.
हा ‘देख ले ! इंडिया’ माहितीपट अधिकाधिक शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये दाखविण्यात यावा, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण होईल, असे सांगत राज्यपालांनी विद्यापीठांनी दिव्यांग खेळाडूंना सरावासाठी आपल्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी सूचना केली. तसेच, शासकीय संस्था, सार्वजनिक उपक्रम (PSU), कॉर्पोरेट आणि खासगी क्षेत्रांनी देखील या दिव्यांग खेळाडूंना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कोलंबो येथे झालेल्या अंतिम सामन्यात नेपाळचा पराभव करून विश्वचषक जिंकल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी भारतीय संघाच्या सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक कौतुक केले. हा ऐतिहासिक विजय म्हणजे आत्मविश्वासाचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. “दिव्यांग खेळाडूंना सहानुभूतीची गरज नसून त्यांना संधीची गरज असते, आणि या अंध महिला क्रिकेटपटूंना जेव्हा संधी मिळाली, तेव्हा त्यांनी तिचे सोने करून दाखवले,” असे कौतुक त्यांनी केले. तसेच ‘देख ले इंडिया’ माहितीपटाच्या निर्मात्या शांती मोहन आणि दिग्दर्शक मुकुंद मूर्ती यांचेही त्यांनी अभिनंदन केले. याशिवाय, कार्यक्रमादरम्यान राज्यपाल व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार विजेत्या दिव्यांग खेळाडू डॉ. दीपा मलिक यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
या सत्कार सोहळ्यात भारतीय अंध महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार दीपिका टी. सी., उपकर्णधार गंगा कदम, सिमू दास, प्रिया खीर, अनु कुमारी, जमुना राणी टुडू, काव्या, अनेखा देवी, बसंती हंसदा, सिमरणजित कौर, सुनीता सराटे, पर्बती मरांडी, फुला सोरेन, काव्या एन. आर., सुषमा पटेल आणि दुर्गा येवले या सर्व प्रतिभावान खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. तसेच क्रिकेट असोसिएशन फॉर ब्लाइंड इन इंडियाचे अध्यक्ष डॉ. महांतेश जी. के. आणि चित्रपट निर्माते-दिग्दर्शकांचाही गौरव करण्यात आला.
