दिवाळीच्या खरेदीवर महागाईची सावली; आरबीआयने दिला इशारा

दिवाळीच्या काळात महागाई ५.९ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा आरबीआयचा अंदाज. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण आढाव्यात दिला इशारा.

मुंबई : दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांच्या खिशावर महागाईचा भार वाढण्याची शक्यता आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आपल्या ताज्या पतधोरण आढाव्यात चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत महागाईचा दर ५.९ टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला आहे. जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि पुरवठा साखळीवरील दबावामुळे महागाई वाढण्याची शक्यता असल्याचे आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी स्पष्ट केले.

ऑगस्ट २०२६ च्या पतधोरण बैठकीनंतर आरबीआयने रेपो दर ५.२५ टक्के कायम ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, आगामी काळात महागाईचा दबाव कायम राहू शकतो, असा इशाराही देण्यात आला.

महागाईचा त्रैमासिक अंदाज

  • पहिली तिमाही (जून २०२६): ४.१%
  • दुसरी तिमाही (सप्टेंबर २०२६): ४.७%
  • तिसरी तिमाही (डिसेंबर २०२६): ५.९% (सर्वाधिक)
  • चौथी तिमाही (मार्च २०२७): ५.५%
  • २०२७-२८ ची पहिली तिमाही: ५.३%

आरबीआयच्या मते, चालू आर्थिक वर्षात सरासरी महागाईचा दर ५ टक्क्यांपेक्षा अधिक राहण्याची शक्यता असून, तो आरबीआयच्या ४ टक्के लक्ष्यापेक्षा जास्त राहील.

ऑक्टोबर ते डिसेंबर हा कालावधी आर्थिक वर्षाची तिसरी तिमाही असून, याच काळात दिवाळीचा सण येतो. या तिमाहीत महागाईचा दर ५.९ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज असल्याने अन्नधान्य, इंधन आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महागाई वाढीमागील कारणे

आरबीआयनुसार, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ, पुरवठा साखळीवरील दबाव आणि काही वस्तूंच्या वाढलेल्या किमती यामुळे महागाईवर परिणाम होत आहे. जून महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित महागाई ४.४ टक्क्यांवर पोहोचली. तब्बल १६ महिन्यांनंतर हा दर आरबीआयच्या ४ टक्के लक्ष्यापेक्षा वर गेला आहे.

मात्र, कोअर महागाई अद्याप नियंत्रणात असल्याने अर्थव्यवस्थेवरील एकूण दबाव मर्यादित असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर जीडीपी वाढीचा अंदाज कायम असल्याने अर्थव्यवस्थेसाठी हा काहीसा दिलासादायक संकेत मानला जात आहे.

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

महिलांच्या गळ्यातील दागिने लुटणारा सराईत अटकेत; ७ गुन्हे उघडकीस

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software