महिलांच्या गळ्यातील दागिने लुटणारा सराईत अटकेत; ७ गुन्हे उघडकीस

सातारा शहर डी.बी. पथकाची धडक कारवाई. आनेवाडी-पाचवड परिसरात सापळा रचून सराईत चेन स्नॅचरला अटक, १२.७५ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त.

सातारा: सातारा शहरात आणि लगतच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरीने ओरबाडून नेणाऱ्या एका सराईत चोरट्याला सातारा शहर डी.बी. पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. या धडक कारवाईमुळे सातारा शहर, शाहूपुरी आणि सातारा तालुका पोलीस ठाणे हद्दीतील एकूण ७ गंभीर गुन्हे उघडकीस आले असून, पोलिसांनी आरोपीकडून तब्बल १२ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल यशस्वीपणे हस्तगत केला आहे.

           मिळालेल्या माहितीनुसार, मागील महिन्यात (दि. १६ जुलै २०२६ रोजी) रात्री साडे अकराच्या सुमारास सातारा शहरातील सिद्धिविनायक मंगल कार्यालय ते अश्विनी पार्क संगमनगर, प्रतापसिंहनगर परिसरातील रस्त्यावरून एक महिला पायी चालत जात होती. यादरम्यान, मोटार सायकलवरून आलेल्या एका अज्ञात इसमाने त्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचा दागिने जबरदस्तीने हिसकावून लांब पळ काढला. या प्रकरणी पीडित महिलेने सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंद करून तपासाची चक्रे फिरवली.

       सदर घटनेची गांभीर्य लक्षात घेता, सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. सचिन म्हेत्रे यांनी शहर डी.बी. पथकाला या गुन्हेगाराचा कसून शोध घेण्याचे आदेश दिले होते.

सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीच्या आधारे लावला छडा:

घटना स्थळाजवळील परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली असता, सातारा शहर, शाहूपुरी आणि सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाच प्रकारे चेन स्नॅचिंगचे एकूण ७ गुन्हे घडल्याचे समोर आले. सर्व गुन्ह्यांमधील संशयित आरोपी एकच असून तो पुणे-सातारा हायवे वरून येऊन चोरी करून पुन्हा त्याच दिशेने पसार होत असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार सातारा शहर डी.बी. पथकाने आनेवाडी आणि पाचवड परिसरात सापळा रचून, दिनांक ४ ऑगस्ट २०२६ रोजी संशयित आरोपीला जेरबंद केले. सुरुवातीला पोलिसांच्या चौकशीत तो टाळाटाळ करत होता आणि उडवा उडवीची उत्तरे देत होता; मात्र डी.बी. पथकाने कौशल्यपूर्ण व सखोल चौकशी केल्याने त्याने सात वेगवेगळ्या ठिकाणी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली.

उघडकीस आलेले गुन्हे:

आरोपीने खालीलप्रमाणे सात गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे: १. सातारा शहर पोलीस ठाणे: गु.र.नं. ५८५/२०२६, बीएनएस ३०४(२) – सोन्याचे मनी मंगळसूत्र

२. सातारा शहर पोलीस ठाणे: गु.र.नं. ५९९/२०२६, बीएनएस ३०४(२) – सोन्याचे मनी मंगळसूत्र

३. सातारा शहर पोलीस ठाणे: गु.र.नं. ६०१/२०२६, बीएनएस ३०४(२) – सोन्याचे मनी मंगळसूत्र

४. सातारा शहर पोलीस ठाणे: गु.र.नं. ६१६/२०२६, बीएनएस ३०४(२) – सोन्याचे मनी मंगळसूत्र

५. सातारा तालुका पोलीस ठाणे: गु.र.नं. ३०९/२०२६, बीएनएस ३०४(२) – सोन्याचे मनी मंगळसूत्र

६. शाहूपुरी पोलीस ठाणे: गु.र.नं. २१२/२०२६, बीएनएस ३०४(२) – सोन्याचे मनी मंगळसूत्र

७. शाहूपुरी पोलीस ठाणे: गु.र.नं. २२०/२०२६, बीएनएस ३०४(२) – सोन्याचे मनी मंगळसूत्र

पोलिसांची धडाकेबाज कामगिरी:

पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विपुल पाटील, सातारा शहरचे पोलीस निरीक्षक श्री. सचिन म्हेत्रे आणि शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक श्री. संग्राम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर डी.बी. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, अशोक सावंजी तसेच सातारा शहर, शाहूपुरी आणि सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने ही महत्त्वाची कामगिरी फत्ते केली आहे. सराईत गुन्हेगाराच्या अटके मुळे सातारा शहरातील महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असला, तरी पोलिसांच्या या जलद तपासाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

महिलांच्या गळ्यातील दागिने लुटणारा सराईत अटकेत; ७ गुन्हे उघडकीस

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software