- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- मीरा रोडच्या शाळेचा कांदा-बटाटा बंदीचा निर्णय अखेर मागे
मीरा रोडच्या शाळेचा कांदा-बटाटा बंदीचा निर्णय अखेर मागे
मीरा रोड येथील सेव्हन स्केअर शाळेचा विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-बटाटा बंदीचा निर्णय मागे. मनसेच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची माघार.
मुंबई: मीरा रोड येथील एका नामांकित शाळेत विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा, लसूण आणि बटाटा आणण्यावर घालण्यात आलेल्या प्रतिबंधावरून निर्माण झालेला वाद अखेर शाळेने तो निर्णय मागे घेतल्यानंतर संपुष्टात आला आहे. पर्यूषण पर्वाच्या पार्श्वभूमीवर पालकांना पाठवलेल्या मेसेज आणि शाळेच्या परिसरात लावण्यात आलेल्या फलकांमुळे मोठा वादंग निर्माण झाला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) या प्रकारा विरोधात आक्रमक भूमिका घेत ‘खळखट्याक’चा इशारा दिल्यानंतर अवघ्या काही तासांतच शाळेने नमती भूमिका घेत आपला हा निर्णय मागे घेतल्याचे जाहीर केले आहे.
मीरा भाईंदर परिसरातील शालेय विद्यार्थ्यांच्या डब्यातील खाद्य पदार्थांवरून सुरू झालेला हा वाद काहीसा चिघळला होता. मीरा रोडमधील ‘सेव्हन स्केअर’ ही शाळा भाजपचे स्थानिक माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या कुटुंबियांच्या मालकीची खासगी शाळा आहे. सध्या जैन धर्मीयांचा पवित्र पर्यूषण काळ सुरू असल्यामुळे, शाळेने पालकांच्या अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुपवर एक संदेश पाठवून विद्यार्थ्यांनी डब्यात कांदा, लसूण आणि बटाटा आणू नये, असे आवाहन केले होते. एवढेच नव्हे तर या संदर्भातील फलकही शाळेच्या परिसरात झळकवण्यात आला होता. लहान मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर अशा प्रकारे शाळांकडून धार्मिक व आहाराचे निर्बंध लादल्यामुळे पालकांमध्ये आणि नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता.
या संपूर्ण प्रकरणाला राजकीय वळण मिळाल्या नंतर भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी आपली बाजू स्पष्ट करताना, पर्यूषण हा अत्यंत पवित्र काळ असून या काळात प्राण्यांची कत्तल होऊ नये या सद्भावनेतून पालकांना केवळ विनंती करण्यात आली होती, असे स्पष्ट केले होते. ही कोणतीही सक्ती नसून धार्मिक भावनांचा आदर करण्याचे केवळ एक आवाहन असल्याचे सांगत कोणीही यावरून राजकारण करू नये, असे मेहता यांनी म्हटले होते. मात्र, मराठा एकीकरण समितीसह राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या प्रकाराला अतिशय तीव्र विरोध दर्शवला. मुलांनी डब्यात काय खावे आणि काय खाऊ नये हे ठरवण्याचा अधिकार शाळेला कोणी दिला, असा संतप्त सवाल करत मनसेने शाळेच्या या भूमिकेचा कडाडून निषेध केला. प्रत्येकाला आपल्या धार्मिक भावना जपण्याचा अधिकार आहे, मात्र त्याचा परिणाम कोणाच्या वैयक्तिक आहाराच्या स्वातंत्र्यावर होता कामा नये, अशी ठाम भूमिका घेत मनसेने आक्रमक पवित्रा धारण केला होता.
मनसेचा हा तीव्र विरोध आणि आंदोलनाचा इशारा पाहता शाळेच्या प्रशासनाने तातडीने माघार घेण्याचा निर्णय घेतला. शाळेने संबंधित वादग्रस्त निर्णय पूर्णपणे मागे घेत असल्याचे जाहीर केले असून, परिसरामध्ये लावण्यात आलेला तो फलकही तात्काळ काढून टाकण्यात आला आहे. शालेय स्तरावर अशा प्रकारे खाण्या पिण्याच्या सवयींवर निर्बंध लादण्याच्या प्रकारावर पालकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना, मनसेच्या दणक्यानंतर हा वाद तूर्तास मिटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
