हडपसरमध्ये सिलेंडर स्फोटाने खळबळ; ८ घरांना आगीची झळ

पुण्यातील हडपसर येथे गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत ८ पत्र्याची घरे जळून खाक. आमदार चेतन तुपे पाटील यांनी दिली भेट.

पुणे: पुण्यातील हडपसर परिसरातील माळवाडी येथील दाट लोकवस्तीच्या विहार कॉलनी मध्ये गुरुवारी दुपारी भीषण आग लागल्याची दुर्देवी घटना घडली. अचानक भडकलेल्या या आगीने अवघ्या काही मिनिटांतच रौद्ररूप धारण केल्याने आठ पत्र्याची घरे जळून पूर्णपणे खाक झाली. या आगीदरम्यान एका घरगुती गॅस सिलिंडरचा झालेला मोठा स्फोट यामुळे संपूर्ण परिसरात एकच दहशत पसरली होती. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी आठही कुटुंबांचा संसार आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

       घटना स्थळावरून मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार, हडपसर मधील माळवाडी येथील विहार कॉलनी येथे माणिक तुपे यांच्या मालकीची पत्र्याची घरे आहेत. ही घरे त्यांनी परिसरातील कष्टकरी व कामगार कुटुंबांना भाड्याने दिली होती. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी घरातील कर्ते पुरुष व महिला कामानिमित्त बाहेर गेले होते, तर काही मुले शाळेत गेली होती. दरम्यान, दुपारी पावणे बारा ते बारा वाजण्याच्या सुमारास अचानक एका पत्र्याच्या घरातून धुराचे लोळ बाहेर येऊ लागले. पाहता पाहता या आगीने तीव्र स्वरूप धारण केले आणि आजूबाजूच्या घरांनाही आपल्या तडाख्यात घेतले. काही वेळातच एका घरामध्ये असलेल्या गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. आगीचे प्रचंड लोळ आणि सिलिंडरच्या स्फोटाचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांची धावपळ उडाली आणि नागरिकांनी सुरक्षिततेसाठी तातडीने घराबाहेर पळ काढला.

        घटनेची माहिती मिळताच हडपसर अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर पाण्याचा मारा सुरू केला. आगीची तीव्रता पाहता मदतकार्यासाठी काळेपडळ आणि बी. टी. कवडे रोड येथील अग्निशामक दलाच्या गाड्यांनाही त्वरित बोलावण्यात आले. तीनही गाड्यांवरील जवानांनी अवघ्या काही मिनिटांत अथक प्रयत्न करून आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. या घटनेमुळे घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे काही वेळ वाहतुकीचा व बचावाचा प्रश्न निर्माण झाला होता.

       या दुर्दैवी आगीमध्ये विजय खंडू धर्माकरी, निशा करण माने, बापुराव थोरात, सुषमा बाळासाहेब गोदाम, संजय गोरे, बाबू अवसळे, अमोल पवार आणि महानंदा सूर्यवंशी या आठ कुटुंबांच्या घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य आणि कपडे जळून खाक झाले असून, ऐन सणासुदीच्या काळात या कुटुंबांवर मोठे संकट ओढवले आहे.

        घटनेची गंभीर दखल घेत स्थानिक आमदार चेतन तुपे पाटील आणि हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयाचे प्रभाग अध्यक्ष प्रशांत तुपे यांनी तातडीने घटना स्थळी भेट देऊन संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली. बाधित कुटुंबांची झालेली दयनीय अवस्था पाहता, प्रशासनाच्या वतीने या सर्व कुटुंबांच्या राहण्याची आणि भोजनाची तात्पुरती व्यवस्था लवकरात लवकर केली जाईल, तसेच शासनाकडून योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन आमदार चेतन तुपे पाटील यांनी यावेळी दिले. या दुर्घटने प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अधिकृत नोंद करण्यात आली असून, आग लागण्याचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

‘संशोधन प्रयोगशाळेतच नको’; समाजाच्या गरजा ओळखून तंत्रज्ञान विकसित करा – राज्यपाल

Latest News

‘संशोधन प्रयोगशाळेतच नको’; समाजाच्या गरजा ओळखून तंत्रज्ञान विकसित करा – राज्यपाल ‘संशोधन प्रयोगशाळेतच नको’; समाजाच्या गरजा ओळखून तंत्रज्ञान विकसित करा – राज्यपाल
आयसीटी माटुंगा येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे प्रतिपादन. वैज्ञानिकांना हरित व शाश्वत तंत्रज्ञान विकसित करण्याचे आवाहन.
कामगारांच्या आरोग्यासाठी मोठा निर्णय; ईएसआयसी रुग्णालयांत खासगी रुग्णालयांच्या मदतीने उपचार
ब्रिक्स शिखर परिषदेसाठी दिल्ली सज्ज; मोदी-पुतीन-शी जिनपिंग भेटीने वाढली उत्सुकता
अमेरिकेतील भारतीय IT कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा; H-1Bचा ६० दिवसांचा अवधी रद्द होण्याची शक्यता
एमपीएससीच्या गट-क परीक्षेचे वेळापत्रक बदलले; आता ३ जानेवारीला परीक्षा

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software