- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- ‘संशोधन प्रयोगशाळेतच नको’; समाजाच्या गरजा ओळखून तंत्रज्ञान विकसित करा – राज्यपाल
‘संशोधन प्रयोगशाळेतच नको’; समाजाच्या गरजा ओळखून तंत्रज्ञान विकसित करा – राज्यपाल
आयसीटी माटुंगा येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे प्रतिपादन. वैज्ञानिकांना हरित व शाश्वत तंत्रज्ञान विकसित करण्याचे आवाहन.
मुंबई: वैज्ञानिक संशोधन आणि नवोन्मेष केवळ प्रयोगशाळा किंवा शोध निबंधांच्या चौकटीत न अडकता समाजा समोरील ज्वलंत समस्या सोडविण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरले पाहिजे, असे स्पष्ट प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले आहे. माटुंगा येथील नामांकित रसायन तंत्रज्ञान संस्था (आयसीटी) येथे आयोजित ‘हरित रसायनशास्त्र आणि शाश्वत अभियांत्रिकी’ विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ज्येष्ठ वैज्ञानिक प्रा. एम. लक्ष्मी कांतम यांच्या गौरवार्थ रसायन तंत्रज्ञान संस्था (आयसीटी) आणि इंडियन केमिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने या उच्चस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
भारताच्या वेगाने विस्तारत असलेल्या उत्पादन आणि रसायन उद्योगांच्या पार्श्वभूमीवर बोलताना राज्यपाल म्हणाले की, देशातील वैज्ञानिक आणि संशोधकांनी केवळ इतर देशांनी विकसित केलेले तंत्रज्ञान स्वीकारण्यापुरते स्वतःला मर्यादित ठेवू नये; तर संपूर्ण जगाने स्वीकारावे असे दर्जेदार हरित तंत्रज्ञान भारतात विकसित करण्याचे ध्येय ठेवले पाहिजे. व्यवहार्य, परवडणारी आणि मोठ्या प्रमाणावर सहज वापरता येतील अशी हरित तंत्रज्ञाने विकसित करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. तसेच आयसीटी आणि इंडियन केमिकल सोसायटीने भारताला हरित रसायनशास्त्र, उत्प्रेरण आणि शाश्वत रासायनिक अभियांत्रिकीचे जागतिक केंद्र बनविण्यासाठी आपले योगदान अधिक प्रभावी करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
विज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करताना राज्यपालांनी रसायन तंत्रज्ञान संस्थेने दरवर्षी ‘विज्ञान आणि समाज सप्ताह’ आयोजित करावा, अशी महत्त्वाची सूचना केली. या सप्ताहादरम्यान सर्वसामान्य नागरिक, महाविद्यालये आणि शाळकरी मुलांसाठी संस्थेची दालने खुली करून संस्थेत सुरू असलेले संशोधन अत्यंत सोप्या भाषेत जनसामान्यां पर्यंत पोहोचवावे, जेणेकरून विज्ञानावरील जनतेचा विश्वास वाढेल आणि तरुणांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजेल, असे त्यांनी नमूद केले. विज्ञानाचा अंतिम उद्देश जनसेवा हाच असून, वैज्ञानिकांच्या संशोधनाचा दैनंदिन जीवनात नेमका कसा उपयोग होऊ शकतो, याची माहिती नागरिकांना असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, विज्ञान क्षेत्रातील महिलांना संशोधनात, प्रशासनात आणि उद्योजकतेमध्ये नेतृत्वाच्या समान संधी उपलब्ध करून देण्याचे आवाहन करत त्यांनी परिषदेत १२ कर्तृत्ववान महिला वैज्ञानिकांचा गौरव करण्यात आल्याबद्दल विशेष समाधान व्यक्त केले.
रासायनिक अभियांत्रिकी क्षेत्राची प्रदूषणकारी उद्योग म्हणून होत असलेली बदनामी दूर करताना, प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा देखील याच क्षेत्रातून निघणार आहे, असे प्रतिपादन संस्थेचे कुलगुरू प्रा. अनिरुद्ध पंडित यांनी केले. तर आयसीटीने देशासाठी तब्बल १८ पद्म पुरस्कार विजेते वैज्ञानिक आणि सुमारे ७ हजार प्रथम पिढीतील उद्योजक घडवल्याची माहिती माजी कुलगुरू तथा इंडियन केमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. गणपती यादव यांनी दिली. राज्यातील विद्यापीठांनी मोठ्या प्रमाणावर संशोधक आणि पीएचडीधारक निर्माण करण्याची गरज माजी कुलगुरू प्रा. एम. एम. शर्मा यांनी व्यक्त केली. या शानदार सोहळ्यात हरित रसायनशास्त्र आणि शाश्वत अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. एम. लक्ष्मी कांतम आणि ज्येष्ठ वैज्ञानिक पद्मविभूषण प्रा. एम. एम. शर्मा यांचा राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे माजी सचिव पद्मभूषण डॉ. टी. रामासामी, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांच्यासह देश-विदेशातील वैज्ञानिक, उद्योजक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी या आंतरराष्ट्रीय परिषदेस उपस्थित होते.
