- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- पुण्याच्या विकासकामांना गती देण्याचे निर्देश; सुनेत्रा पवारांचा PMRDA ला आदेश
पुण्याच्या विकासकामांना गती देण्याचे निर्देश; सुनेत्रा पवारांचा PMRDA ला आदेश
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी PMRDA आढावा बैठकीत पुणे रिंग रोड, माण-हिंजवडी मेट्रो लाईन-३ आणि नदी प्रदूषण रोखण्याच्या प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश दिले.
मुंबई: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) क्षेत्राचा झपाट्याने होत चाललेला विस्तार, वाढती लोकसंख्या आणि औद्योगिकीकरण लक्षात घेऊन, येथील सर्व पायाभूत सुविधांची विकासकामे अधिक वेगाने आणि उच्च गुणवत्तेसह पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले आहेत. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित उच्चस्तरीय आढावा बैठकीत त्यांनी पीएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेत प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना केल्या.
या बैठकीस उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नमूद केले की, पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात तब्बल ६७४ गावांचा आणि सुमारे ५,२१५ चौरस किलोमीटर क्षेत्राचा विस्तार समाविष्ट आहे. या अवाढव्य क्षेत्रातील नागरीकरण, पर्यटन संधी आणि लोकसंख्येचा वाढता ओघ पाहता, आगामी अनेक दशकांची गरज लक्षात घेऊन सर्वंकष व दीर्घकालीन नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे.
पुण्यातील वाहतूक व्यवस्था अधिक बळकट आणि सक्षम करण्यासाठी पुणे इनर रिंग रोड, कॉम्प्रिहेंसिव्ह मोबिलिटी प्लॅन (CMP) अंतर्गत प्रस्तावित प्रकल्प, हिंगणगाव पूल तसेच यवत रेल्वे ब्रिज यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांना युद्धपातळीवर गती देण्याचे आदेश त्यांनी दिले. केवळ रस्ते निर्माण करण्यावर भर न देता, मल्टिमोडल हब, औद्योगिक कनेक्टिव्हिटी, धार्मिक स्थळे व पर्यटन क्षेत्रांची जोडणी तसेच विमानतळाशी थेट सुलभ कनेक्टिव्हिटी मिळण्याच्या दृष्टीने एकात्मिक वाहतूक आराखडा तयार करण्यात यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झालेल्या माण-हिंजवडी परिसरासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या माण-हिंजवडी-शिवाजीनगर पुणे मेट्रो लाईन-३ चे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, असे निर्देश देण्यात आले. या २३ स्थानकांच्या मेट्रो मार्गिकेतील १२ स्थानकांचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित ५ स्थानकांचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प विहित वेळेत पूर्ण करून नागरिकांच्या सेवेत लवकरात लवकर कसा आणता येईल, यासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे त्यांनी सांगितले.
पर्यावरण संरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी इंद्रायणी, पवना, मुळा आणि मुठा या नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठीचे प्रकल्प सर्वोच्च प्राधान्य देऊन तातडीने मार्गी लावण्यास सांगितले. नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी केवळ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे पुरेसे नसून, भविष्यातील देखभाल व संचालनाचा खर्च सहज भागवता येईल अशा आर्थिकदृष्ट्या शाश्वत पद्धतीने या प्रकल्पांचे दीर्घकालीन नियोजन करण्यावर त्यांनी भर दिला. तसेच, वाढत्या नागरीकरणा सोबतच कासार आंबोली येथील निर्माणाधीन अग्निशमन केंद्रासह प्रस्तावित इतर १२ नवीन अग्निशमन केंद्रांच्या कामांना गती देऊन आपत्कालीन यंत्रणा अधिक लोकाभिमुख व तत्पर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
भविष्यातील पाण्याची वाढती गरज आणि नवीन वसाहतींचा विस्तार लक्षात घेऊन पीएमआरडीए क्षेत्रात पिण्याच्या पाण्याचे दीर्घकालीन नियोजन आतापासूनच करण्याचे आदेश त्यांनी दिले. यासाठी नवीन जलस्रोत विकसित करण्यावर भर देण्यात यावा, असे सांगत पुणे महानगर प्रदेशाचा विकास हा केवळ रस्ते आणि इमारतींपुरता मर्यादित न राहता वाहतूक, पाणी, पर्यावरण, उद्योग आणि नागरिकांच्या जीवनमानाचा सर्वंकष विचार करणारा असावा, अशी स्पष्ट अपेक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली.
