- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- माझ्या मतदारसंघात तब्बल ५० हजार बोगस मतदार; संजय गायकवाडांच्या दाव्याने राजकीय खळबळ
माझ्या मतदारसंघात तब्बल ५० हजार बोगस मतदार; संजय गायकवाडांच्या दाव्याने राजकीय खळबळ
बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी मतदारसंघात ५० हजार बोगस मतदार असल्याचा खळबळजनक दावा करत निवडणूक आयोगाच्या कारवाईचे स्वागत केले आहे.
बुलढाणा: राज्यातील आगामी राजकीय आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेत्यांची विधाने आणि दावे-प्रतिदावे जोरात सुरू असतानाच, बुलढाणा मतदारसंघातील शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या एका अत्यंत स्फोटक विधानामुळे मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. आपल्याच मतदारसंघात तब्बल ५० हजार बोगस मतदार असल्याचा खळबळजनक दावा आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. विशेष म्हणजे, विरोधकांकडून नेहमीच बोगस मतांच्या आधारावर निवडणुका जिंकल्याचा आरोप केला जात असताना, सत्ताधारी पक्षाच्या आमदारानेच स्वतःच्या मतदार संघात मोठ्या प्रमाणावर बोगस मतदार असल्याचे जाहीरपणे मान्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मतदार यादीच्या पुनरावृत्ती आणि सुधारणा प्रक्रियेमुळे (SIR) आपल्या मतदारसंघातील तब्बल ७१ हजार मते कमी झाल्याचे सांगत त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कार्यपद्धतीचे मुक्तकंठाने कौतुक केले आहे.
मीडियाशी संवाद साधताना आमदार संजय गायकवाड म्हणाले की, यापूर्वी विरोधक सातत्याने असा दावा करत होते की सत्ताधारी पक्षाचे नेते बोगस मतांच्या जोरावर निवडून येतात. मात्र, त्यावेळी वस्तुतिथी उघड करताना आपणच सर्वात आधी आपल्या मतदारसंघात ५० हजार बोगस मतदार असल्याचे उघडपणे कबूल केले होते. मतदारयाद्यांमध्ये अनेक नावे दुबार (डबल) आणि बोगस असल्याचे निदर्शनास आले होते. निवडणूक आयोगाकडून राबवण्यात आलेल्या विशेष प्रक्रियेमुळे माझ्या मतदारसंघातील तब्बल ७१ हजार मते कमी झाली असून, हे सर्व बोगस आणि संशयास्पद मतदार प्रामुख्याने मागील काँग्रेस सरकारच्या काळातील असल्याचे त्यांनी आरोप केला. सध्या मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत पारदर्शक आणि योग्य पद्धतीने काम सुरू असून, आता खऱ्या अर्थाने निकषांनुसार शुद्ध मतदार यादी तयार होत असल्याचे सांगत त्यांनी निवडणूक आयोगाच्या कारवाईचे समर्थन केले.
या मुलाखतीत केवळ मतदार यादीपुरतेच नव्हे, तर राज्याच्या इतर राजकीय घडामोडींवरही त्यांनी रोखठोक भाष्य केले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या चर्चेवर बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांचा हवाला दिला. ज्याप्रमाणे आमच्या पक्षातही अनेक कार्यकर्त्यांना दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात असे वाटते, अगदी तसेच दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्याही मनात एकत्र येण्याची भावना असू शकते, असे त्यांनी नमूद केले. मात्र, सद्यस्थितीत दोन्ही शिवसेना एकत्र येणे शक्य नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी राजकीय वास्तवावर बोट ठेवले. तसेच सध्याच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासन आणि प्रशासना कडून तातडीने पावले उचलली जात असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः बांधावर जाऊन पाहणी करत असल्याचा दावा त्यांनी केला.
यावेळी विरोधकांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही त्यांनी जोरदार निशाणा साधला. शेतकऱ्यांना थेट नगदी (कॅश) मदत देण्याची मागणी करणाऱ्या विरोधकांना लक्ष्य करत त्यांनी सवाल केला की, शरद पवार साहेब स्वतः चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत, मग त्यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर कधी शेतकऱ्यांना अशा प्रकारे तातडीने रोख पैसे दिले होते का? असा संतप्त सवाल त्यांनी केला. दुष्काळ जाहीर होण्यापूर्वीच राजकारण करण्यासाठी विरोधकांनी आंदोलने आणि मोर्च्यांचा घाट घातला होता, मात्र राज्य सरकारने वेळेत दुष्काळ जाहीर केल्यामुळे विरोधकांची ती राजकीय स्वप्ने धुळीला मिळाली आहेत, असा घणाघात त्यांनी केला. शेतकरी आणि दुष्काळाच्या संकटावर विरोधक केवळ स्वार्थी राजकारण करत असल्याचा आरोप करत त्यांनी या भूमिकेचा निषेध केला आहे.
