- Hindi News
- पुणे
- दिवाळीच्या रेल्वे तिकिटांसाठी प्रवाशांची धावपळ; बुकिंग सुरू होताच तिकिटे फुल्ल,वेटिंग’चा मनस्ताप
दिवाळीच्या रेल्वे तिकिटांसाठी प्रवाशांची धावपळ; बुकिंग सुरू होताच तिकिटे फुल्ल,वेटिंग’चा मनस्ताप
पुण्यातून दिवाळीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांना रेल्वे तिकिटांचे बुकिंग सुरू होताच 'वेटिंग' आणि 'रिग्रेट'चा सामना करावा लागत आहे. विशेष गाड्यांची मागणी वाढली आहे.
पुणे: दिवाळीच्या आनंदात आपल्या कुटुंबिया सोबत गावी जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या चाकरमान्या समोर आणि प्रवाशांसमोर रेल्वे तिकीट आरक्षणाने मोठे संकट उभे केले आहे. सणासुदीच्या कालावधीत लांब पल्ल्याच्या गाड्यांचे आरक्षण सुरू होताच अवघ्या काही मिनिटांत सर्व तिकिटे संपल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. आरक्षण खिडकी उघडल्यानंतर किंवा ऑनलाइन पोर्टलवर प्रक्रिया सुरू केल्यानंतर अवघ्या काही क्षणांतच ‘कन्फर्म’ तिकिटांचा कोटा फुल्ल होत असून, प्रवाशांना ‘वेटिंग’ किंवा थेट ‘रिग्रेट’चा सामना करावा लागत आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत गावी पोहोचायचे कसे, असा बिकट प्रश्न लाखो प्रवाशा समोर निर्माण झाला असून रेल्वे प्रशासनाच्या नियोजनावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पूर्वी रेल्वे प्रशासना कडून प्रवाशांच्या सोयीसाठी तब्बल १२० दिवस (चार महिने) आधी आरक्षणाची सुविधा दिली जात होती, जी नंतर कमी करून ६० दिवस करण्यात आली. मात्र, आरक्षणाचा हा कालावधी कमी झाल्यानंतरही सणासुदीच्या काळातील प्रचंड मागणीत आणि ताणतणावात कोणताही फरक पडलेला नाही. लांब पल्ल्याचा प्रवास तुलनेने सुरक्षित, सोयीस्कर आणि आर्थिकदृष्ट्या किफायतशीर असल्यामुळे नागरिकांची पहिली पसंती नेहमीच रेल्वे प्रवासाला असते. नोव्हेंबरमध्ये येणाऱ्या दिवाळीसाठी अनेकांनी दोन महिने आधीपासूनच आपल्या नियोजनाची जय्यत तयारी केली होती. ठरलेल्या दिवशी सकाळी बरोबर आठ वाजता अधिकृत संकेतस्थळ किंवा ॲपवरून तिकीट काढण्यासाठी धडपड करणाऱ्या प्रवाशांच्या हाती निराशाच आली. गाडी आणि प्रवासाची तारीख निवडून प्रत्यक्ष पैसे भरण्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचेपर्यंत सर्व जागा फुल्ल झाल्याचे संदेश स्क्रीनवर झळकले. काही गाड्यांमध्ये वेटिंग मिळण्याची शक्यताही संपल्यामुळे प्रवाशांना मोठा मानसिक धक्का बसला. ऑनलाइन प्रक्रियेतील या अडचणी टाळण्यासाठी थेट रेल्वे स्थानकाच्या तिकीट खिडक्यांवर रांगेत उभे राहिलेल्या प्रवाशांनाही हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही.
पुणे स्थानकातून सुटणाऱ्या आणि विदर्भ, मराठवाडा, कोकण तसेच उत्तर भारताकडे जाणारी गाड्यांना नेहमीच तुफान गर्दी असते. पुण्याहून विदर्भाच्या दिशेने धावणाऱ्या अजनी-पुणे एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस, गरीब रथ, हमसफर एक्स्प्रेस आणि नागपूर-पुणे एक्स्प्रेसच्या आरक्षणासाठी जणू काही युद्धच सुरू असते. याशिवाय दिल्ली, लखनौ, पटना, दाणापूर, कोलकाता, आझाद हिंद एक्स्प्रेस, पुणे-काझीपेठ एक्स्प्रेस आणि झेलम एक्स्प्रेस यांसारख्या महत्त्वाच्या गाड्यांमधील सर्व श्रेण्यांमधील जागा अवघ्या काही सेकंदांत फुल्ल झाल्या आहेत. दलालांच्या आणि बेकायदेशीर एजंटांच्या ऑनलाइन हस्तक्षेपाचा मोठा फटका सामान्य प्रवाशांना बसत असल्याची तीव्र तक्रार यावेळी समोर आली आहे. अत्याधुनिक सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञानाचा गैरवापर करून अवघ्या काही सेकंदांत शेकडो तिकिटे बोगस आयडीद्वारे बूक केली जात असल्याचा आरोप संतप्त प्रवाशां कडून होत आहे.
वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे स्थानकावरील ताणही कमालीचा वाढला आहे. केवळ ६ फलाट असलेल्या पुणे स्थानकातून दररोज सुमारे १७० प्रवासी रेल्वेगाड्या धावतात आणि सामान्य दिवसांत येथे जवळपास १ लाख ७० हजार प्रवासी ये-जा करतात. मात्र, सणासुदीच्या आणि दिवाळीच्या काळात हा दैनंदिन प्रवासी भार वाढून थेट २ लाखांच्या घरात पोहोचतो. निकिता देशपांडे या प्रवासी महिलेने आपल्या व्यथा मांडताना सांगितले की, दोन महिन्यांपासून केलेल्या नियोजना नंतरही सकाळी आठ वाजता तिकीट काढताना काही मिनिटांत सर्व संपले, आता केवळ विशेष रेल्वे गाड्या (Festival Special Trains) सुरू होण्याच्या आशेवर राहावे लागत आहे. प्रवाशांची ही प्रचंड परवड लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने दसरा आणि दिवाळीच्या काळात तात्काळ अतिरिक्त व विशेष फेऱ्या सुरू कराव्यात, तसेच तिकीट काळ्या बाजारात विकणाऱ्या आणि दलालांच्या हस्तक्षेपावर कडक नियंत्रण ठेवावे, अशी जोरदार मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे.
