- Hindi News
- पुणे
- हुंड्याच्या छळाचा आरोप अन् वैष्णवीचा दुर्दैवी अंत; नवविवाहित आयटी अभियंतेच्या मृत्यूने पुण्यात खळबळ
हुंड्याच्या छळाचा आरोप अन् वैष्णवीचा दुर्दैवी अंत; नवविवाहित आयटी अभियंतेच्या मृत्यूने पुण्यात खळबळ
पुण्यातील उंड्री परिसरात ५ लाख रुपयांच्या हुंड्यासाठी मानसिक छळ सहन न झाल्याने २३ वर्षीय आयटी इंजिनियर वैष्णवी गिसरे हिने आत्महत्या केली.
पुणे: पुणे शहरातून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि हुंडाबळीची संतापजनक घटना समोर आली आहे. उंड्री-वडाचीवाडी परिसरात अवघ्या चार महिन्या पूर्वीच मोठ्या थाटामाटात लग्न झालेली २३ वर्षीय नवविवाहिता आणि आयटी इंजिनियर असलेल्या वैष्णवी ओंकार गिसरे हिने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. कार खरेदीसाठी माहेरच्या कडून ५ लाख रुपयांची हुंड्यापोटी सतत मागणी केली जात होती आणि याच असह्य मानसिक छळाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप तिच्या माहेरच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळी विरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
प्राप्त माहिती नुसार, वैष्णवी आणि ओंकार यांचा विवाह ९ मे २०२६ रोजी अत्यंत धुमधडाक्यात पार पडला होता. विवाहाला अवघे चार महिने लोटले असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. मृत वैष्णवी ही उच्चशिक्षित असून ती आयटी इंजिनियर म्हणून कार्यरत होती. तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत दिलेल्या माहिती नुसार, विवाहाच्या वेळी माहेरच्यांनी क्षमतेपेक्षा अधिक खर्च करत सुमारे ४५ लाख रुपये खर्च केला होता आणि हुंड्यात १० तोळे सोनेही दिले होते. असे असतानाही सासरच्या मंडळींची लालसा कमी झाली नाही आणि विवाहा नंतर काही दिवसांतच त्यांच्या कडून नवीन कार खरेदीसाठी माहेरहून रोख ५ लाख रुपये आणण्याची बळजबरी सुरू करण्यात आली.
या पैशांच्या मागणीसाठी वैष्णवीवर सातत्याने शारीरिक व मानसिक दबाव टाकला जात होता. सासरच्या लोकांकडून होणाऱ्या या सततच्या त्रासामुळे ती प्रचंड तणावाखाली होती. अखेर गुरुवारी रात्रीच्या सुमारास याच टोकाच्या छळाला कंटाळून तिने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवला.याप्रकरणी मृत वैष्णवीचे वडील प्रवीण रघुनाथ जरांडे यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीच्या आधारे पोलिसांनी पती ओंकार संजय गिसरे (वय २८), सासरे संजय महादेव गिसरे (वय ४९) आणि सासू रुपाली संजय गिसरे (वय ४२) यांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. हुंडा प्रतिबंधक कायदा तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी (Abetment of Suicide) हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिसा कडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. अवघ्या चार महिन्यांच्या संसारानंतर आयटी इंजिनियर तरुण मुलीचा अशा प्रकारे अंत झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांमधून होत आहे.
