- Hindi News
- पुणे
- काळेपडळ पोलिसांचा गांजा तस्करांवर छापा; ८.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त, सहा आरोपी अटकेत
काळेपडळ पोलिसांचा गांजा तस्करांवर छापा; ८.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त, सहा आरोपी अटकेत
पुण्यातील काळेपडळ पोलिसांनी एसआरपीएफ मैदानाजवळ छापा टाकून ८.५५ लाखांच्या गांजासह ६ आरोपींना अटक केली.
पुणे : शहरातील अवैध अमली पदार्थांच्या विक्री विरोधात काळेपडळ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एसआरपीएफच्या मोकळ्या मैदानाजवळ संशयास्पदरीत्या गांजा घेऊन थांबलेल्या व्यक्तीला ताब्यात घेतल्या नंतर पोलिसांनी तपासाची दिशा गांजा पुरवठादारांपर्यंत नेली. या कारवाईत गांजा, चारचाकी वाहन आणि मोबाईल फोन असा एकूण ८ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी गांजा विक्री व पुरवठ्याशी संबंधित सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
२१ सप्टेंबर २०२६ रोजी काळेपडळ पोलीस ठाण्याचे तपास पथक परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार विशाल ठोंबरे, महादेव शिंदे, नितीन ढोले आणि गिरीराज जगदाळे यांना एसआरपीएफच्या मोकळ्या मैदानाजवळ एक व्यक्ती पांढऱ्या रंगाची पिशवी घेऊन संशयास्पदरीत्या उभी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पंचांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेथे संशयिताची झडती घेतली असता त्याच्याकडील पिशवीमध्ये १ किलो ४४ ग्रॅम गांजा आढळून आला.
या प्रकरणी पोलिसांनी योगेश प्रल्हाद अडसुळ (४०, रा. हडपसर, पुणे) याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध काळेपडळ पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी योगेश अडसुळ याच्या कडून गांजाचा पुरवठा करणाऱ्या व्यक्तींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान विजय राजू हुबळीकर (२९), बबन बाबुराव दांडगे (३९), अशोक ऊर्फ अक्षय सतीश जाधव (२८), साहील सुभाष ठोंबरे (२७) आणि विकास संदीप बोडडे (२०) या पाच जणांना अटक करण्यात आली.
पोलिसांच्या कारवाईत गांजा, चारचाकी वाहन आणि मोबाईल फोन असा एकूण ८ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी गांजाचा पुरवठा आणि विक्री नेमक्या कोणत्या पद्धतीने करीत होते, तसेच या टोळीशी आणखी कोणाचा संबंध आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या पूर्वीच्या गुन्हेगारी नोंदींची तपासणी केली असता, काही आरोपी विरुद्ध कोथरूड, यवत, वानवडी, नगर तालुका आणि भिंगार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न आणि एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्ह्यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (परिमंडळ ६) जीवन बेनीवाल, सहाय्यक पोलीस आयुक्त (हडपसर विभाग) अतुलकुमार नवगिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) अण्णासो बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड, अमित शेटे तसेच पोलीस पथकातील अधिकारी आणि अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास काळेपडळ पोलीस करीत आहेत.
