- Hindi News
- पुणे
- विश्वासाच्या नात्याला काळिमा; विश्रांतवाडीत १२ वर्षीय मुलीवर अत्याचार, आरोपी शेजारी गजाआड
विश्वासाच्या नात्याला काळिमा; विश्रांतवाडीत १२ वर्षीय मुलीवर अत्याचार, आरोपी शेजारी गजाआड
पुण्यातील विश्रांतवाडीत १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या ५२ वर्षीय शेजाऱ्याला पोलिसांनी अटक केली. घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी रस्ता रोको केला.
पुणे: पुणे शहरातील विश्रांतवाडी परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. घरातील पीठ संपल्यामुळे शेजाऱ्याच्या घरी पीठ मागण्यासाठी गेलेल्या एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ५२ वर्षीय नराधम शेजाऱ्याने बळजबरी करत लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या अमानुष कृत्यानंतर आरोपीने मुलीला गंभीर परिणामांची धमकी दिली होती; मात्र पीडितेने हिंमत दाखवून हा सर्व प्रकार आपल्या आईला सांगितल्या नंतर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला जेरबंद केले आहे. या घटने मुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, नागरिकांनी रस्त्यावर उतरत निदर्शने केली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहिती नुसार, जयसिंग साठे (वय ५२) असे अटक करण्यात आलेल्या नराधम आरोपीचे नाव आहे. आरोपी साठे हा पुणे महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीने सफाई कर्मचारी म्हणून काम करत असून तो पीडित मुलीच्या घराजवळच राहत होता. गेल्या १२ सप्टेंबर रोजी घरातील पीठ संपल्याने ती अल्पवयीन मुलगी शेजारी राहणाऱ्या जयसिंग साठे याच्या घरी पीठ मागण्यासाठी गेली होती. त्या संधीचा गैरफायदा घेत नराधमाने तिला बळजबरीने आपल्या घरात ओढले, तिच्याशी अश्लील चाळे केले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हे घृणास्पद कृत्य केल्यानंतर आरोपीने या प्रकरणाची वाच्यता कोणाकडेही केल्यास तिच्या वडिलांना खोटी माहिती देऊन कुटुंबात मोठे भांडण लावून देईन आणि गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली, ज्यामुळे घाबरलेली मुलगी काही दिवस प्रचंड दबावाखाली होती.
अखेर काही दिवसांनंतर घडलेल्या या मानसिक व शारीरिक त्रासातून सावरत पीडित मुलीने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. मुलीची आपबिती ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता २२ सप्टेंबर रोजी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत नराधम जयसिंग साठे विरुद्ध अधिकृत फिर्याद दिली. पोलिसांनी या गंभीर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ पोक्सो (POCSO) कायद्यान्वये आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कलमांखाली गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तातडीने तपास करत आरोपी साठे याला बेड्या ठोकल्या आणि न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सुनावणी दरम्यान आरोपीची कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, अल्पवयीन मुलीवरील या अमानुष अत्याचाराची माहिती वाऱ्यासारखी पसरताच विश्रांतवाडी परिसरातील नागरिक, महिला वर्ग आणि सामाजिक संघटना मध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. अशा विकृत प्रवृत्तीच्या नराधमाला फाशी किंवा कठोर शिक्षा झालीच पाहिजे, या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरत जोरदार आंदोलन केले. या आंदोलना दरम्यान नागरिकांनी तब्बल दीड ते दोन तास बीआरटी (BRT) मार्ग पूर्णपणे रोखून धरला, ज्यामुळे या परिसरातील वाहतूक व्यवस्था काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आणि नागरिकांची समजून काढल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. या घटनेमुळे पुन्हा एकदा बाल सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
