- Hindi News
- सातारा
- सातारा सिव्हिल हॉस्पिटल तोडफोड प्रकरण: चार आरोपींना ३ वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा
सातारा सिव्हिल हॉस्पिटल तोडफोड प्रकरण: चार आरोपींना ३ वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा
सातारा:
सिव्हिल हॉस्पिटल सातारा येथे बेकायदेशीर जमाव जमवून शासकीय कामात अडथळा आणणे, वैद्यकीय अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करणे आणि हॉस्पिटलमध्ये तोडफोड करून नुकसान केल्याप्रकरणी चार आरोपींना ३ वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी ६,५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ६ वे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. आर. सोलापूरकर यांनी हा निकाल दिला.
दिनांक ३ जुलै २०१९ रोजी रात्री सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या जखमी रुग्णांवरून वाद घालत आरोपींनी फिर्यादी डॉ. भगवान पितळे व वैद्यकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. तसेच शासकीय कामात अडथळा आणून एक्स-रे रूम नंबर २ च्या दाराची काच फोडून सरकारी मालमत्तेचे नुकसान केले. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
या खटल्यामध्ये विशाल बाळू भिसे, विक्रम दिलीप साठे, गणेश काळू देवकुळे आणि विशाल बाळू मोहिते (सर्व रा. लक्ष्मीटेकाडी, सदरबाजार, सातारा) यांना दोषी ठरवून ही शिक्षा ठोठावण्यात आली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील आशीर्वाद कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले.
