- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- कुणकेश्वरमध्ये ताजचा ‘ट्री ऑफ लाइफ’; सिंधुदुर्गच्या पर्यटनाला जागतिक भरारी
कुणकेश्वरमध्ये ताजचा ‘ट्री ऑफ लाइफ’; सिंधुदुर्गच्या पर्यटनाला जागतिक भरारी
सिंधुदुर्गातील कुणकेश्वर येथे ताज हॉटेल्सचा 'ट्री ऑफ लाइफ' प्रकल्प. मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात ऐतिहासिक करार.
मुंबई : कोकणातील पर्यटन क्षेत्राला जागतिक पातळीवर नवी झेप मिळवून देण्यासाठी राज्य शासनाकडून एक अत्यंत महत्त्वाचे आणि दूरगामी पाऊल उचलण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील ‘कोकणची काशी’ म्हणून अत्यंत पवित्र आणि प्रसिद्ध असलेल्या कुणकेश्वर येथे नामांकित ताज हॉटेल्सच्या उच्चस्तरीय ‘ट्री ऑफ लाइफ’ (Tree of Life) ब्रँड अंतर्गत एक अत्याधुनिक आणि आलिशान हॉटेल उभारण्याचा ऐतिहासिक करार मंत्रालयात संपन्न झाला आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महत्त्वाच्या प्रशासकीय व व्यावसायिक मान्यवरांच्या साक्षीने हा करार पार पडला असून, आगामी अवघ्या २४ महिन्यांत ५० खोल्यांचे हे भव्य हॉटेल पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनासमोर ठेवण्यात आले आहे.
शिरोडा-वेळागर येथील यशस्वी प्रकल्पानंतर आता थेट कुणकेश्वरसारख्या धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या किनारपट्टीवर ताज समूहाचे हॉटेल साकारत असल्यामुळे देवगडसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला एक अभूतपूर्व चालना मिळणार आहे. कोकणातील अफाट आणि नयनरम्य निसर्ग सौंदर्याला जागतिक दर्जाच्या आदरातिथ्य (Hospitality) आणि आधुनिक पर्यटन सुविधांची जोड मिळाल्यास देश-विदेशातील पर्यटकांचा ओघ या भागात मोठ्या प्रमाणावर वाढेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या प्रकल्पाच्या माध्यमातून केवळ पर्यटनाचा विस्तार होणार नसून, स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होईल. तसेच स्थानिकांना नवीन व्यवसायाच्या व स्वयंरोजगाराच्या हक्काच्या संधी उपलब्ध होऊन जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नात मोलाची भर पडणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला राष्ट्रीयच नव्हे तर जागतिक नकाशावर एक अग्रगण्य आणि पसंतीचे पर्यटन केंद्र म्हणून स्थापित करण्याच्या दिशेने हा प्रकल्प एक मोठा मैलाचा दगड ठरणार आहे. मंत्रालयात पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण करार सोहळ्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, ताज ग्रुपचे प्रतिनिधी तन्वीर जाहीदी, दत्तात्रय हिरे, तसेच रोहन रानडे हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. कोकणच्या शाश्वत आणि पर्यावरण पूरक विकासाचा ध्यास घेत शासनाने हाती घेतलेल्या अशा प्रकल्पांमुळे स्थानिकांच्या हाताला काम मिळण्या सोबतच स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी आणि भक्कम ऊर्जा प्राप्त होणार आहे.
