- Hindi News
- सातारा
- सातारा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; चार दुचाकी चोरीचे गुन्हे उघड, साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त
सातारा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; चार दुचाकी चोरीचे गुन्हे उघड, साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त
सातारा पोलिसांनी ३ सराईत वाहनचोरांच्या मुसक्या आवळल्या; ४ मोटारसायकली आणि रिक्षासह ३ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त.
सातारा: सातारा शहरात वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सातारा पोलिसांनी मोठी कारवाई करत एकाच गुन्ह्याच्या तपासात तब्बल चार मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अत्यंत चलाखीने आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने सापळा रचून तीन सराईत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी चोरट्या कडून तब्बल ३ लाख ८५ हजार रुपये किमतीच्या चार मोटारसायकल आणि गुन्ह्यात वापरलेली एक रिक्षा असा एकूण मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे वाहनचोरांचे धाबे दणाणले आहेत.
या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, गत ३० ऑगस्ट २०२६ रोजी शाहुपूरी पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीची अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहरात सातत्याने घडणाऱ्या वाहन चोरीच्या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी शाहुपूरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांना तात्काळ गुन्हे उघडकीस आणण्याचे कडक निर्देश दिले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शेवाळे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला विशेष सूचना देऊन आरोपींच्या शोधाकासाठी मोहीम तीव्र केली होती.
दरम्यान, १८ सप्टेंबर २०२६ रोजी शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना, गोपनीय बातमीदारा कडून महत्त्वाची माहिती मिळाली. सातारा शहरातील मोळाचा ओढा परिसरात काही संशयित इसम फिरत असल्याची टीप मिळाल्या नंतर पोलिसांनी तात्काळ त्या भागात सापळा रचला. सातारा शहरातील मोळाचा ओढा येथील राजपुरोहित बेकरीसमोर एक संशयित इसम मोटारसायकल सह थांबलेला आढळला. पोलीस पथकाने त्यास शिताफीने ताब्यात घेऊन त्याचे नाव-गाव विचारले आणि त्याच्याकडील मोटारसायकल बाबत चौकशी केली असता त्याने केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यास पोलीस ठाण्यात आणून कौशल्यपूर्वक चौकशी केली असता त्याने ही मोटार सायकल चोरल्याची कबुली दिली आणि या गुन्ह्यात आणखी एक साथीदार असल्याचे सांगितले.
पहिल्या आरोपीच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दुसऱ्या साथीदाराचा शोध सुरू केला. गोपनीय बातमीदारा कडून मिळालेल्या माहिती नुसार दुसरा संशयित इसम सातारा एसटी स्टँड परिसरात फिरत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तिथे धाव घेतली आणि त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडेही चौकशी केली असता त्याने शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन आणि मेढा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन अशा एकूण चार मोटारसायकली चोरल्याची धक्कादायक कबुली दिली. या प्रकरणातील आरोपींची नावे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी जगदीश दत्तात्रय दळवी (वय १९, रा. म्हाते, ता. जावली, जि. सातारा), विक्रम शिवाजी भांडवलकर (वय २१, रा. ठाकुरकी, फलटण, जि. सातारा) आणि गौरव आनंदा कदम (वय २२, रा. मालचौडी, ता. जावली, जि. सातारा) या तिन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास पोलीस हवालदार मनोज मदने करत आहेत.
या संपूर्ण कारवाईमध्ये पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेल्या चार मोटारसायकली आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण ३ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रियांका बाबर आणि पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार सुरेश घोडके, मनोज मदने, निलेश काटकर, जोतीराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल सावंत, सुमित मोरे, संग्राम फडतरे, विशाल धुमाळ व रोहित बाजारे यांच्या पथकाने पार पाडली आहे.
