- Hindi News
- सातारा
- #Draft: Add Your Title
#Draft: Add Your Title
सातारा-लोणंद मार्गावरील वाढे-वडुथ येथील जुने दगडी पूल सुरक्षेसाठी अवजड वाहनांसाठी बंद; २८ सप्टेंबरपासून नवे पर्यायी मार्ग लागू.
सातारा : सातारा-लोणंद मार्गावरील वाढे आणि वडुथ गावाजवळील वेण्णा व कृष्णा नदीवरील दगडी कमानीचे पूल अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पावसाळ्यामुळे पुलांच्या संरचनात्मक स्थितीवर परिणाम झाल्याने सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे २८ सप्टेंबर २०२६ पासून सातारा-लोणंद मार्गावरील अवजड वाहनांच्या वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३४ अन्वये याबाबत अधिसूचना जारी केली आहे. हे वाहतूक बदल २८ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२.०१ वाजल्यापासून २० जून २०२७ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.
अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग
लोणंदकडून साताऱ्याकडे येणारी अवजड वाहने लोणंद-खंडाळा/शिरवळ मार्गे पुणे-बेंगळुरू महामार्गावरून साताऱ्याकडे जातील. साताऱ्या कडून वाढे फाटामार्गे लोणंद किंवा फलटणकडे जाणारी अवजड वाहने वाढे फाट्यावरून न वळता पुणे-बेंगळुरू महामार्गावरून खंडाळा/शिरवळ मार्गे लोणंद किंवा फलटणकडे वळविण्यात आली आहेत. साताऱ्या कडून फलटणकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून कोरेगाव-पुसेगाव-ताथवडे घाट मार्ग निश्चित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे फलटणकडून साताऱ्याकडे येणारी अवजड वाहने फलटण-ताथवडे घाट-पुसेगाव-कोरेगाव मार्गे साताऱ्याकडे येतील.
आदर्की मार्गे येणाऱ्या अवजड वाहनांसाठी आदर्की फाटा (फौजी ढाबा)-वाठार-पिंपोडे बु.-सर्कलबोडी-शिरगाव घाट-जোशीविहीर मार्गे पुणे-बेंगळुरू महामार्गावरून साताऱ्याकडे जाण्याचा पर्याय देण्यात आला आहे. तसेच आदर्की फाट्यावरून लोणंद-खंडाळा/शिरवळ मार्गे पुणे-बेंगळुरू महामार्गावर जाण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
एसटी आणि स्कूल बसला परवानगी
वाहतूक बदलातून एसटी बसेस आणि स्कूल बसेसना सवलत देण्यात आली आहे. आणीबाणीच्या सेवा, विद्यार्थी, महिला आणि स्थानिक नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी या बसेसना संबंधित पुलांवरून ये-जा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, सर्व प्रकारच्या हलक्या वाहनांची वाहतूक पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार असून त्यांच्या मार्गात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या दोन्ही ठिकाणी नवीन समांतर पुलांचे बांधकाम प्राधान्याने सुरू आहे. नवीन पुलांचे काम पूर्ण झाल्यानंतर जुन्या पुलांवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या वाहतूक बदलांची वाहन धारकांनी नोंद घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
