- Hindi News
- पुणे
- पुणे गणेशोत्सवात महिलांची सुरक्षा धोक्यात; गर्दीचा फायदा घेत ५ महिलांचे दागिने लंपास
पुणे गणेशोत्सवात महिलांची सुरक्षा धोक्यात; गर्दीचा फायदा घेत ५ महिलांचे दागिने लंपास
पुण्यात गणेशोत्सवाच्या गर्दीत ५ महिलांचे सोन्याचे दागिने चोरीला. दगडूशेठ गणपती व शनिवारवाडा परिसरात घटना; फरासखाना पोलिसांत गुन्हे दाखल.
पुणे: पुणे शहरात सध्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाने आणि गणेशोत्सवाच्या अभूतपूर्व उत्साहाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आहे. मात्र, या आनंदाच्या वातावरणातही सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गणेशोत्सवाच्या गर्दीत शहरवासीयांच्या अथांग उत्साहाचा आणि प्रचंड गर्दीचा गैरफायदा घेत महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लांबविण्याच्या अनेक चोरट्या घटना उघडकीस आल्या आहेत. शहरातील शनिवारवाडा, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ परिसर आणि हुतात्मा बाबु गेनू तरुण मंडळ या अत्यंत वर्दळीच्या आणि नामांकित परिसरांमध्ये एकापाठोपाठ एक अशा पाच महिलांचे दागिने चोरीला गेल्याची गंभीर प्रकार समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या सर्व प्रकरणांची गंभीर दखल घेत फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसां समोर गर्दीतील पाकीटमार व चेनस्नॅचर्सचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
या संदर्भातील सविस्तर माहिती नुसार, पहिल्या घटना छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील शनिवारवाडा परिसरात घडल्या. कोथरूड भागात राहणाऱ्या एका २७ वर्षीय महिला रविवारी २० सप्टेंबर रोजी शनिवारवाड्याजवळ तात्पुरत्या स्वरूपात भरलेल्या दुकानांमध्ये सणासुदीची खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. या अत्यंत गर्दीच्या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी हातचलाखी करत त्यांच्या गळ्यातील ३८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लांबविले. याच परिसरात खरेदीसाठी आलेल्या आणखी एका महिलेचेही दागिने अशाच प्रकारे चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय, दुसरी मोठी घटना शहराचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या उत्सव मंडपाच्या परिसरात घडली. बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी गर्दीत आलेल्या खडकी येथील ३८ वर्षीय महिला दर्शन घेत असतानाच, गर्दीच्या रेट्याचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपयांचे मंगळसूत्र लबाडीने लांबविले. ही घटना १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. तिसरी घटना हुतात्मा बाबु गेनू तरुण मंडळाच्या उत्सव मंडपात घडली, जिथे बोपखेल येथून आलेली ३३ वर्षीय महिला दर्शनासाठी आली असताना तिच्या गळ्यातील पावणेचार ग्रॅम वजनाचे जुने सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत ओरबाडले. याशिवाय मुळच्या नांदेड येथील राहणाऱ्या एका २६ वर्षीय महिलेचेही ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र गर्दीत चोरट्यांच्या टोळीने कट रचून चोरल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांचा मोठा बंदोबस्त शहरात असतानाही गर्दीचा गैरफायदा घेऊन सक्रिय झालेल्या चोरांच्या टोळ्यांमुळे महिला भगिनींमध्ये सुरक्षितते बाबत मोठी भीती निर्माण झाली आहे. सण-उत्सवांच्या काळात फिरणारे हे पाकीटमार आणि दागिने चोरटे विशिष्ट कट रचून महिलांना लक्ष्य करत असल्याचे या घटनांवरून स्पष्ट होते. फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या चोरीच्या मालिकांमुळे पोलिसांच्या गस्तीवर आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, याप्रकरणी पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा कसून शोध घेत आहेत.गणेत्सवाचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी, विशेषतः महिलांनी गर्दीच्या ठिकाणी स्वतःच्या दागिन्यांची आणि सामानाची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत असून गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
