- Hindi News
- पुणे
- MPSC आंदोलनावरून रोहित पवारांचा सरकारला इशारा; ‘परवानगी नसली तरी आंदोलन होणारच’
MPSC आंदोलनावरून रोहित पवारांचा सरकारला इशारा; ‘परवानगी नसली तरी आंदोलन होणारच’
पुण्यात २७ सप्टेंबरला MPSC विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन होणारच; रोहित पवारांचा सरकारला इशारा. MPSC अध्यक्ष राजीनामा व ७० हजार पदभरतीची मागणी.
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला आता तीव्र आणि राजकीय वळण मिळाले आहे. पुणे पोलिसांनी अद्याप या आंदोलनासाठी अधिकृत परवानगी दिलेली नसली तरी, ठरल्या प्रमाणे आगामी २७ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता शहरातील गरवारे रस्त्यावर विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन होणारच, अशी स्पष्ट आणि आक्रमक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मांडली आहे. मंगळवारी आयोजित एका विशेष पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करत विद्यार्थ्यांच्या मागण्या तात्काळ पूर्ण करण्याची मागणी केली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर २६ सप्टेंबरला आंदोलन करण्याचे टाळून प्रशासनाच्या सूचने नुसार २७ सप्टेंबरची तारीख निश्चित करण्यात आली असून, हे आंदोलन किती दिवस चालेल हे परिस्थिती नुसार ठरवले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत बोलताना आमदार रोहित पवार यांनी MPSC विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांवर प्रकाश टाकला. यामध्ये आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा राजीनामा, तुकाराम मुंढे आणि सुनील गेडाम यांची आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करणे, सर्व परीक्षा ऑनलाइन ऐवजी पारंपरिक पद्धतीने ऑफलाइन घेणे आणि रिक्त असलेल्या ७० हजार पदांची भरती प्रक्रिया तातडीने सुरू करणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. आयोगाच्या अध्यक्षा विरोधातील सर्व पुरावे लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर सादर केले जाणार असून, जर सरकारने या मागण्या पूर्ण केल्या तर सरकारचा जाहीर सत्कार करू, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांमध्ये काही क्लासचालक होते आणि त्यांना फसवून नेण्यात आले होते, असा गंभीर आरोप त्यांनी केला. विद्यार्थ्यांमध्ये कोणताही गट पडलेला नसून, आंदोलनाशी संबंधित सुमारे ७० ते ८० विद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटिसा देऊन त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. या आंदोलनाला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी बुधवारी दिल्लीला जाणार असून, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रत्यक्ष आंदोलन स्थळी उपस्थित राहावे, अशी विनंती त्यांना करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पेपर फुटीच्या आधी पासूनच स्थापन करण्यात आलेल्या राधा समिती कडून टप्प्या टप्प्याने ऑनलाइन परीक्षा घेण्याची भूमिका मांडली जात असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचेही ते म्हणाले.
केवळ MPSC विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरच नव्हे, तर मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टी आणि शेतकरी प्रश्नांवरही रोहित पवार यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे सुमारे ३५ हजार कोटी, तर संपूर्ण राज्यात मिळून तब्बल ८० हजार कोटी रुपयांचे अतोनात नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला. शासनाकडून घोषित करण्यात आलेली एकरी साडेआठ हजार रुपयांची मदत अत्यंत अपुरी असून, उर्वरित नुकसानीची भरपाई कशी मिळणार, असा संतप्त सवाल त्यांनी केला. तसेच, पीकविमा कंपन्या कडून शेतकऱ्यांना अद्यापही हक्काचे पैसे मिळाले नसल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाला जाब विचारला. या गंभीर संकटावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळ तयार करावे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सह काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना सोबत घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. अलनिनोचे मोठे संकट मार्च २०२७ पर्यंत कायम राहण्याची शक्यता आपण यापूर्वीच सरकारला वर्तवली होती, याची आठवण त्यांनी करून दिली.
