- Hindi News
- पुणे
- पुणे विमानतळाच्या १५ किमी परिसरात 'लेझर शो' आणि 'प्रखर लाईट्स'वर बंदी; पोलीस सह आयुक्तांचे आदेश
पुणे विमानतळाच्या १५ किमी परिसरात 'लेझर शो' आणि 'प्रखर लाईट्स'वर बंदी; पोलीस सह आयुक्तांचे आदेश
पुणे: विमान उड्डाणे आणि वैमानिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुणे शहर पोलिसांनी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लोहगाव येथील भारतीय वायुसेना आणि नागरी विमानतळाच्या १५ किलोमीटर परिघात प्रखर बीम लाईट आणि लेझर बीम लाईट वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पुणे शहर पोलीस सह आयुक्त संजय दराडे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ नुसार याबाबतचा अधिकृत आदेश जारी केला आहे.
वैमानिकांच्या डोळ्यांवर विपरीत परिणामाची भीती
पुणे विमानतळावरून दररोज मोठ्या संख्येने विमान आणि हेलिकॉप्टरचे उड्डाण आणि लँडिंग होते. रात्रीच्या वेळी वैमानिकांना रनवे आणि दिशा समजण्यासाठी विशिष्ट लाईट्सचा वापर केला जातो. मात्र, शहरात विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने आकाशात प्रखर बीम लाईट्स आणि लेझरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. यामुळे वैमानिकांचे डोळे दिपून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता भारतीय वायुसेनेने वर्तवली होती. याची गंभीर दखल घेत प्रशासनाने हा प्रतिबंधात्मक निर्णय घेतला आहे.
आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई
हा सुधारीत आदेश २७ मे २०२६ पासून पुढील ६० दिवसांसाठी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात लागू असणार आहे. या कालावधीत कोणत्याही व्यक्तीला किंवा कार्यक्रम आयोजकांना आकाशात प्रखर लाईट्स किंवा लेझर बीम सोडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता कलम २२३ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
