- Hindi News
- पुणे
- पुण्यात गुन्हे शाखेची मोठी कारवाई; खराडी येथून २१ लाखांच्या 'एमडी' ड्रग्जसह राजस्थानचा तस्कर जेरबंद
पुण्यात गुन्हे शाखेची मोठी कारवाई; खराडी येथून २१ लाखांच्या 'एमडी' ड्रग्जसह राजस्थानचा तस्कर जेरबंद
पुणे:
पुणे शहरातून अंमली पदार्थांचे समूळ नष्ट करण्यासाठी पुणे पोलिसांनी सध्या विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत पुणे पोलीस गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने खराडी भागात एक मोठी कारवाई केली आहे. मुंढवा-खराडी रस्त्यावरील बस स्टॉपजवळ संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एका आंतरराज्यीय ड्रग्ज तस्कराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून तब्बल २० लाख ९८ हजार ४०० रुपये किमतीचे १०४ ग्रॅम ९२ मिलिग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हे अंमली पदार्थ आणि एक मोबाईल फोन, असा एकूण २१ लाख ८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
महावितरण क्लास 1 अधिकारी ACB च्या जाळ्यात वाचासविस्तर
इम्रान युसुफ शेख (वय ३८ वर्षे, सध्या रा. थिटेनगर, दत्त मंदिराजवळ, खराडी, पुणे; मूळ रा. गायरी मोहल्ला, प्रतापगड, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रप्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध एन.डी.पी.एस. (NDPS) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जून २०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी खराडी परिसरात गस्त घालत होते. यावेळी मुंढवा-खराडी रोडवरील एच.पी. पेट्रोल पंपाजवळ असलेल्या बस स्टॉपपाशी एक इसम अत्यंत संशयास्पद रितीने उभा असल्याचे पोलीस अंमलदार निशिकांत सावंत यांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तात्काळ पुढे होऊन त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली, ज्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला.
त्यानंतर दोन पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेण्यात आली असता, त्याच्याकडे बेकायदेशीरपणे विक्रीसाठी आणलेले १०४ ग्रॅम ९२ मिलिग्रॅम वजनाचे 'एमडी' ड्रग्ज आढळून आले. पोलिसांनी ड्रग्जसह त्याच्याकडील १० हजार रुपयांचा मोबाईल जप्त केला आहे. हा अंमली पदार्थांचा साठा त्याने कोठून आणला होता आणि तो पुण्यात कोणाला विकणार होता, याचा पुढील तपास आता पोलीस करत आहेत.
सदरची धडक कारवाई पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) गौहर हसन, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, तसेच पोलीस अंमलदार निशिकांत सावंत, अमोल सरडे, रिहान पठाण, संजय राजे, निलेश जाधव, अतुल क्षिरसागर, सचिन लोहार, विजय कांबळे, तुषार साळुंखे, राहुल शिंदे, आशा भिंगारे, जान्हवी सूर्यवंशी, मंगेश गुंड आणि अक्षय शिर्के यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
