पुणे विसर्जन मिरवणुकीसाठी १० हजार पोलिस तैनात; मंडळांना दोनच ढोल-ताशा पथकांची परवानगी

पुणे गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी १० हजार पोलीस तैनात. प्रत्येक मंडळाला २ ढोल-ताशा पथकांची मर्यादा, लेझर लाईटवर बंदी व AI कॅमेऱ्यांची नजर.

पुणे: पुण्याच्या जगप्रसिद्ध आणि ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली असून, यंदाची मिरवणूक अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि वेळेत पार पाडण्यासाठी पुणे शहर पोलीस दलाने अत्यंत कडक आणि स्पष्ट नियमावली जाहीर केली आहे. आगामी गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक गणेश मंडळाला केवळ दोनच ढोल-ताशा पथकांचा समावेश करण्याची सक्ती करण्यात आली आहे. तसेच, या पथकांना प्रत्येक चौकात केवळ १० मिनिटेच स्थिर वादनाची परवानगी असणार असून वादण संपल्यानंतर अवघ्या ५ मिनिटांत चौकातून पुढे जाणे बंधनकारक करण्यात आले आहे. शहरातील प्रमुख चार विसर्जन मिरवणूक मार्गांवर सहभागी होणाऱ्या तब्बल ६३८ गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत आणि ढोल-ताशा पथकांच्या प्रमुख संचालक व प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकी नंतर पोलीस प्रशासनाने हे महत्त्वपूर्ण नियम लागू केले आहेत.

        पुणे पोलीस आयुक्तालयात पार पडलेल्या या उच्चस्तरीय बैठकीत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मिरवणुकीच्या अंतिम सुरक्षा व वाहतूक नियोजनाची सविस्तर माहिती दिली. यावेळी पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, राजेश बनसोडे, मनोज पाटील, संजय पाटील यांच्यासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्यावरून २६७, टिळक रस्त्यावरून २३१, केळकर रस्त्यावरून ७९ आणि कुमठेकर रस्त्यावरून ५० अशी एकूण ६३८ गणेश मंडळे मुख्य मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. मानद मानाच्या कसबा गणपतीची मिरवणूक ठरलेल्या वेळेत म्हणजेच सकाळी साडेनऊ वाजता सुरू होईल. या सर्व मार्गांवर आणि अत्यंत संवेदनशील परिसरामध्ये चोख कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तब्बल १० हजार पोलीस अधिकारी व अंमलदारांचा तगडा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

        मिरवणुकी दरम्यान होणाऱ्या अवाजवी ध्वनी प्रदूषणावर कडक नियंत्रण मिळवणे हे पोलिसा पूढील सर्वात मोठे आव्हान आहे. शासनाने घालून दिलेली डेसिबलची मर्यादा ओलांडणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आता पर्यंतच्या २४ मंडळांवर कारवाई करत त्यांची साऊंड सिस्टीम जप्त करण्यात आली आहे, तसेच सुमारे ४ हजार ५०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत कोणत्याही प्रकारचे टोल, प्लाझ्मा स्क्रीन, प्रेशर हॉर्न आणि लेझर लाईटच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून, मिरवणुकीत उतरण्यापूर्वी सर्व मंडळांच्या साऊंड सिस्टीमची पूर्वतपासणी केली जाणार आहे. गर्दीचे व्यवस्थापन प्रभावीपणे करण्यासाठी अलका टॉकीज चौक, बेलबाग चौक ते मंडई या अत्यंत गर्दीच्या परिसरांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. क्राउड मॅनेजमेंटसाठी पारंपरिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसोबतच आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित कॅमेरे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत नजर ठेवली जाणार आहे.

          मिरवणुकीत दोन ढोल पथकांना परवानगी देण्यात आली असली तरी, त्या पथकांमधील वांद्यवृंदाच्या संख्येवर कोणतीही सक्तीची मर्यादा घालण्यात आलेली नाही, मात्र पथके अतिशय महाकाय आणि रस्ता अडवणारी असावीत, असे अपेक्षित नाही. बेलबाग चौक ते अलका टॉकीज चौक दरम्यानच्या टप्प्यात सर्व मंडळांनी आपली मिरवणूक साडेतीन ते चार तासांच्या आत अत्यंत शिस्तीत पूर्ण करावी, अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे. मिरवणूक किती तास चालली यापेक्षा ती किती शांततेत, सुरळीत आणि विनाअनुचित प्रकार पार पडली, यावर प्रशासनाचा सर्वाधिक भर असणार आहे. पुण्यातील संस्कृती जपत नागरिकांनी आणि गणेश मंडळांनी प्रशासनाच्या या नियमांचे काटेकोर पालन करून ऐतिहासिक सोहोळा आनंदात आणि सुरक्षितपणे पार पाडावा, असे आवाहन पुणे शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

गणेशोत्सवा पूर्वी सातारा पोलिसांचा दणका; संतोष लंगेश्वर सहा महिन्यांसाठी तडीपार

Latest News

गणेशोत्सवा पूर्वी सातारा पोलिसांचा दणका; संतोष लंगेश्वर सहा महिन्यांसाठी तडीपार गणेशोत्सवा पूर्वी सातारा पोलिसांचा दणका; संतोष लंगेश्वर सहा महिन्यांसाठी तडीपार
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांनी सराईत गुन्हेगार संतोष लंगेश्वर याला ६ महिन्यांसाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
गांजा तस्करावर पुणे पोलिसांचा दणका; PIT-NDPS अंतर्गत कारवाई, नाशिक कारागृहात स्थानबद्ध
दगडूशेठच्या गर्दीत दागिने चोरणारी टोळी जेरबंद; २.५९ लाखांचा ऐवज जप्त
पुणे पोलिसांना मोठा दणका; आरोपींना मारहाण करून धिंड काढल्या प्रकरणी १३ पोलिसांवर गुन्हा
पुण्यात धक्कादायक घटना; बसमध्ये धमकी देऊन तरुणीवर अत्याचाराचा आरोप, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software