दोन वर्षांपासून पुलाचे काम ठप्प; जाशी-पळशी ग्रामस्थ आक्रमक, २ ऑक्टोबरला नदीपात्रात उतरणार

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील जाशी-पळशी पुलाचे काम २ वर्षांपासून ठप्प. २ ऑक्टोबर पर्यंत तोडगा न निघाल्यास ग्रामस्थ नदीपात्रात उतरणार.

दहीवडी: सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात प्रशासकीय अनास्थेचे दर्शन घडवणारी एक गंभीर बाब समोर आली असून, जाशी ते पळशी मार्गावरील माणगंगा नदीवरील महत्त्वाच्या पुलाचे बांधकाम मागील तब्बल दोन वर्षांपासून रखडले आहे. या रेंगाळलेल्या आणि अत्यंत संथ गतीने सुरू असलेल्या कामामुळे संतप्त झालेल्या जाशी येथील ग्रामस्थांनी प्रशासना विरोधात अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या २ ऑक्टोबर पर्यंत प्रशासनाने याप्रकरणी योग्य तो ठोस तोडगा न काढल्यास, पुलाजवळ थेट नदीच्या पाण्यात उड्या मारून तीव्र आंदोलन करण्याचा कडक इशारा देण्यात आला आहे. विवेक विठ्ठल खाडे यांच्यासह समस्त ग्रामस्थांच्या वतीने या संदर्भातील अधिकृत निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग, माण (दहीवडी) चे तहसीलदार तसेच दहीवडी पोलीस ठाण्याला सादर करण्यात आले आहे.

         जाशी ते पळशी मार्गावर असलेला हा पूल परिसरातील दळणवळणाचा कणा मानला जातो. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या पुलाचे बांधकाम अपूर्ण आणि अर्धवट अवस्थेत पडल्यामुळे परिसरातील नागरिक, शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, महिला तसेच वाहनधारकांना नाहक आणि प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. दैनंदिन प्रवासात आणि शेतीमालाची ने-आण करताना होणाऱ्या या अवाजवी त्रासामुळे लोकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनाकडे वारंवार तोंडी व लेखी पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने अखेर ग्रामस्थांना आंदोलनाचे हत्यार उपसणे भाग पडले आहे. प्रशासनाला दिलेल्या निवेदनात रखडलेले काम तात्काळ युद्धपातळीवर सुरू करणे, काम पूर्ण करण्याची निश्चित कालमर्यादा लेखी स्वरूपात देणे, काम रखडण्याची नेमकी कारणे व जबाबदार ठेकेदाराची माहिती सार्वजनिक करणे, तसेच संबंधित अधिकारी व ठेकेदारांची तातडीने बैठक बोलावून हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली आहे. "हा प्रश्न आता केवळ सिमेंट-कॉन्क्रिटच्या बांधकामाचा नसून सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा आणि प्रशासकीय उत्तरदायित्वाचा बनला आहे," असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. मुदतीत निर्णय न झाल्यास उद्भवणाऱ्या कोणत्याही अनुचित परिस्थितीची आणि परिणामांची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

          दुसरीकडे, ग्रामस्थांच्या या आक्रमक भूमिकेनंतर संबंधित यंत्रणेकडून या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. प्रशासना कडून मिळालेल्या माहिती नुसार, या पुलाचे बांधकाम चालू वर्षामध्ये मार्च महिन्या पासून प्रत्यक्षात सुरू करण्यात आले होते, त्यामुळे पूल पूर्णत्वास जाण्यासाठी काहीसा तांत्रिक विलंब होत असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, मागील पंधरा दिवसांपूर्वी पुलाचे काम सुरळीत चालू होते, परंतु ऐन गणेशोत्सवाच्या काळात संबंधित ठेकेदाराचे कामगार हे मूळचे खानदेश भागातील असल्याने उत्सवासाठी आपापल्या गावी गेले होते. त्यामुळे सणासुदीच्या काळात काम काही काळासाठी थांबवावे लागले होते. आता सणांचे दिवस संपल्यामुळे लवकरात लवकर कामाला पुन्हा सुरुवात केली जाईल आणि गती वाढवली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, केवळ आश्वासनांवर विश्वास न ठेवता प्रत्यक्ष कृतीची ठाम मागणी करत ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर अद्यापही कायम असल्याने, येत्या २ ऑक्टोबरपूर्वी प्रशासन काय ठोस पावले उचलते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

गणेशोत्सवा पूर्वी सातारा पोलिसांचा दणका; संतोष लंगेश्वर सहा महिन्यांसाठी तडीपार

Latest News

गणेशोत्सवा पूर्वी सातारा पोलिसांचा दणका; संतोष लंगेश्वर सहा महिन्यांसाठी तडीपार गणेशोत्सवा पूर्वी सातारा पोलिसांचा दणका; संतोष लंगेश्वर सहा महिन्यांसाठी तडीपार
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांनी सराईत गुन्हेगार संतोष लंगेश्वर याला ६ महिन्यांसाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
गांजा तस्करावर पुणे पोलिसांचा दणका; PIT-NDPS अंतर्गत कारवाई, नाशिक कारागृहात स्थानबद्ध
दगडूशेठच्या गर्दीत दागिने चोरणारी टोळी जेरबंद; २.५९ लाखांचा ऐवज जप्त
पुणे पोलिसांना मोठा दणका; आरोपींना मारहाण करून धिंड काढल्या प्रकरणी १३ पोलिसांवर गुन्हा
पुण्यात धक्कादायक घटना; बसमध्ये धमकी देऊन तरुणीवर अत्याचाराचा आरोप, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software