- Hindi News
- सातारा
- ३१ डिसेंबरच्या पार्टीत मारहाण करणाऱ्या आरोपीस ६ महिने सक्तमजुरी व दंडाची शिक्षा
३१ डिसेंबरच्या पार्टीत मारहाण करणाऱ्या आरोपीस ६ महिने सक्तमजुरी व दंडाची शिक्षा
साताऱ्यातील वळसे येथे ३१ डिसेंबरच्या पार्टीनंतर साफसफाईवरून वाद घालून मारहाण करणाऱ्या आरोपीस ६ महिने सक्तमजुरीची शिक्षा.
बोरगाव (सातारा): ३१ डिसेंबरच्या पार्टी दरम्यान भांडी घासणे व साफसफाईच्या कारणावरून झालेल्या वादातून मारहाण करणाऱ्या आरोपीला सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाने ६ महिने सक्त मजुरी आणि २,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास १५ दिवसांचा अतिरिक्त साध्या कारावासाची तरतूद करण्यात आली आहे. समाधान गंगाराम शहापूरकर (वय ३२ वर्ष, रा. वळसे, ता. जि. सातारा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
दिनांक १ जानेवारी २०२२ रोजी रात्री १२:३० वाजण्याच्या सुमारास मौजे वळसे येथील 'मनोप्रेम' प्लॉटींग मधील मोकळ्या जागेत ३१ डिसेंबरची पार्टी साजरी केली जात होती. पार्टी संपल्यानंतर आरोपी तेथून निघून जात असताना, फिर्यादीने त्याला भांडी घासणे व साफसफाई करण्याचे काम बाकी असल्याचे सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. आरोपीने फिर्यादीस लाथ मारून तेथून पळ काढला आणि थोड्या वेळाने लोखंडी गज (रॉड) घेऊन परत आला. त्याने फिर्यादीच्या डाव्या खांद्यावर व डाव्या भुकटीवर/भोवईवर मारहाण करून त्यांना जखमी केले. याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन तपासी अधिकारी आंचल दलाल (सहाय्यक पोलीस अधीक्षक) व आर. डी. माने (पो.ना. ब.नं ६७६) यांनी करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. सदर खटला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (४) श्री. एन. एम. जमादार यांच्या कोर्टात चालला. सरकार तर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील श्री. महेश यु. शिंदे यांनी काम पाहिले. या खटल्यामध्ये एकूण ५ साक्षीदार तपासण्यात आले. सादर केलेले पुरावे, साक्षीदारांची साक्ष आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने भा.दं.वि. ३२४ अन्वये आरोपीस दोषी ठरवून ६ महिने सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली.
