- Hindi News
- सातारा
- गणेशोत्सवा पूर्वी सातारा पोलिसांचा दणका; संतोष लंगेश्वर सहा महिन्यांसाठी तडीपार
गणेशोत्सवा पूर्वी सातारा पोलिसांचा दणका; संतोष लंगेश्वर सहा महिन्यांसाठी तडीपार
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांनी सराईत गुन्हेगार संतोष लंगेश्वर याला ६ महिन्यांसाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
सातारा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सातारा शहर पोलिसांनी सराईत गुन्हेगारा विरोधातील कारवाईला वेग दिला आहे. शरीरा विरुद्ध तसेच मालमत्ते विरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या संतोष अशोक लंगेश्वर (रा. प्रतापसिंगनगर, खेड, सातारा) याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील तरतुदी नुसार कारवाई करण्यात आली असून, त्याला संपूर्ण सातारा जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.
पोलिसांच्या माहिती नुसार, संतोष लंगेश्वर याच्या विरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, घातक हत्यारांनी दुखापत करणे, बेकायदेशीर जमाव जमवून दंगा करणे, दमदाटी आणि शिवीगाळ करणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याच्यावर अटक तसेच विविध प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या होत्या. मात्र, त्याच्या गुन्हेगारी कारवायांमध्ये अपेक्षित बदल झाला नसल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
त्याच्या वर्तणुकीमुळे परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याने त्याच्यावर हद्दपारीची कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलिसा कडून तयार करण्यात आला होता. सातारा शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन म्हत्रे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ५६ अन्वये लंगेश्वर याला सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे सादर केला.
या प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी केली. त्यानंतर झालेल्या सुनावणीत उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी आशिष बारकुल यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ५६(१)(अ)(ब) अन्वये आदेश दिला. त्यानुसार संतोष लंगेश्वर याला सहा महिन्यांसाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक सचिन म्हत्रे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अमित सपकाळ, संदीप पवार, दीपक इंगवले, महिला पोलीस कॉन्स्टेबल निता चव्हाण तसेच उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयातील महेश गंगातिर्थ आणि अभय पवार यांनी कारवाईत सहभाग घेतला. गणेशोत्सवाच्या काळात शहरातील शांतता आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीसह मोक्का आणि एमपीडीए अंतर्गत कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिस प्रशासना कडून सांगण्यात आले आहे.
