- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- एमपीएससी उत्तीर्ण अनुसूचित जातीच्या उमेदवारांना बार्टीकडून १० हजारांची मदत
एमपीएससी उत्तीर्ण अनुसूचित जातीच्या उमेदवारांना बार्टीकडून १० हजारांची मदत
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण अनुसूचित जातीच्या उमेदवारांना बार्टीकडून मुलाखतीसाठी १० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य. जाणून घ्या पात्रता व अर्जाची मुदत.
मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ मध्ये यश संपादन केलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांना मुलाखतीची प्रभावी आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयारी करता यावी, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या मार्फत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. अशा पात्र उमेदवारांना मुलाखतीच्या तयारीसाठी एकरकमी १० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाणार असून, या कल्याणकारी योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी शासनाकडून काही आवश्यक पात्रता निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार, अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे. २५ ऑगस्ट २०२६ रोजी जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ मध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार या सहाय्यासाठी पात्र ठरतील, तसेच या योजनेसाठी उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. या आर्थिक सहाय्यामुळे विद्यार्थ्यांना मुलाखतीच्या पूर्व तयारीसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.
या योजनेसाठी अर्ज करताना उमेदवारांना ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतींचे पालन करावे लागणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी १० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे. केवळ ऑनलाइन अर्ज करून चालणार नाही, तर या ऑनलाइन अर्जाची स्व-साक्षांकित प्रत आणि सर्व आवश्यक कागदपत्रे एकत्र करून ती ११ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ‘बार्टी’, पुणे कार्यालयाकडे पोस्ट अथवा कुरियरद्वारे पाठविणे अनिवार्य आहे. केवळ ऑनलाइन किंवा केवळ ऑफलाइन पद्धतीने सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत, याची विद्यार्थ्यांनी विशेष नोंद घ्यावी.
अर्जासोबत जोडायच्या कागदपत्रां मध्ये जात प्रमाणपत्र अथवा जात वैधता प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र, कायदेशीर ओळख पुरावा तसेच उमेदवाराच्या स्वतःच्या नावे असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकाची प्रत जोडणे गरजेचे आहे. परिपूर्ण कागदपत्रांसह अर्जाची प्रत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), २८/२८, क्वीन्स गार्डन, कॅम्प, पुणे – ४११००१ या पत्त्यावर पाठवावी. या योजनेबाबत अधिक माहिती किंवा तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी ०२०-२६३३३३३० अथवा ०२०-२६३३३३३९ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन ‘बार्टी’ कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
