- Hindi News
- पुणे
- जीसीसी क्षेत्रात पुणे देशात अव्वल ठरणार; वाकडमध्ये अत्याधुनिक केंद्राचे उद्घाटन
जीसीसी क्षेत्रात पुणे देशात अव्वल ठरणार; वाकडमध्ये अत्याधुनिक केंद्राचे उद्घाटन
वाकड येथे मॅग्नमच्या ग्लोबल बिझनेस सोल्युशन्स सेंटरचे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन. आगामी वर्षात पुण्यात ८०० हून अधिक जीसीसी होणार.
पुणे: ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्सचे (जीसीसी) प्रमुख आणि पसंतीचे केंद्र म्हणून पुणे वेगाने विकसित होत असून, आगामी एका वर्षात शहरातील जीसीसींची संख्या आठशेहून अधिक होईल, असा दृढ विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. जीसीसीच्या क्षेत्रात पुण्याने देशात प्रथम क्रमांकाचे स्थान प्रस्थापित करावे, हे राज्य शासनाचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वाकड येथील ईओएन वेस्ट आयटी पार्कमध्ये ‘मॅग्नम आईस्क्रीम कंपनी’च्या ग्लोबल बिझनेस सोल्युशन्स सेंटरच्या भव्य उद्घाटन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या ऐतिहासिक कार्यक्रमास आमदार अमित गोरखे, आमदार शंकर जगताप, उद्योग, गुंतवणूक व सेवा विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक व धोरण सल्लागार कौस्तुभ धवसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी, तसेच मॅग्नम आईस्क्रीम कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी अभिजीत भट्टाचार्य यांच्यासह उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर व कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र हे देशातील ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्ससाठी सर्वात पसंतीचे आणि विश्वासार्ह गुंतवणूक केंद्र बनले असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुण्यात जागतिक कंपन्यांकडून ग्लोबल व्यवसाय सेवा केंद्रे सुरू करण्यासाठी मिळणारा उदंड प्रतिसाद हा येथील उद्योगपूरक वातावरण आणि उपलब्ध उच्च-कुशल मनुष्यबळाची साक्ष देतो. मॅग्नमच्या या नव्या केंद्राच्या माध्यमातून एकाच वेळी एक हजारांहून अधिक थेट रोजगाराच्या संधी निर्माण होणार असून, यामुळे अप्रत्यक्ष रोजगारालाही मोठी चालना मिळणार आहे. कंपनीच्या जागतिक व्यवसाय प्रक्रिया अधिक वेगवान आणि सक्षम करण्यासाठी या केंद्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), स्वयंचलित तंत्रज्ञान, लॉजिस्टिक्स आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाणार आहे.
उत्पादन, वितरण आणि ग्राहक अनुभवाशी संबंधित सर्व प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत मोलाचे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उद्योग आणि शासनाने हातात हात घालून काम केल्यास गुंतवणूक आणि रोजगाराची परिसंस्था अधिक बळकट होते, असे सांगत राज्यात गुंतवणूक करणाऱ्या उद्योगांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
मुंबईतील प्रादेशिक मुख्यालया सोबत आता पुण्यात सुरू झालेले हे ग्लोबल बिझनेस सोल्युशन्स सेंटर मॅग्नमच्या महाराष्ट्रातील विस्ताराला नवी दिशा देणारे ठरेल, असे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, हिंजवडीसह पुण्यातील आयटी क्षेत्राशी संबंधित पायाभूत सुविधा अधिक वेगवान व सक्षम करण्यासाठी शासनाकडून विशेष प्राधान्य दिले जात आहे. याप्रसंगी बोलताना प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन यांनी, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स ही देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारी मुख्य इंजिने असल्याचे स्पष्ट केले. गेल्या १५ महिन्यांत पुण्यात जीसीसीसाठी सुमारे ६० लाख चौरस फूट जागेची मागणी नोंदवली गेली असून, गेल्या १८ महिन्यांत राज्यात १३० नवीन किंवा विस्तारित जीसीसी युनिट्स सुरू झाले आहेत.
आगामी काळात राज्यात ४०० जीसीसी कंपन्या आणि ७०० हून अधिक युनिट्स उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, पुण्यात सध्या ३० हून अधिक देशांतील कंपन्या २० वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
कौस्तुभ धवसे यांनी शासन आणि मॅग्नम कंपनीमधील संबंध परस्पर विश्वास आणि सन्मानावर आधारित असल्याचे स्पष्ट केले, तर मॅग्नमचे मुख्य वित्तीय अधिकारी अभिजीत भट्टाचार्य यांनी महाराष्ट्राच्या गतिमान निर्णयप्रक्रियेचे आणि प्रशासकीय तत्परतेचे कौतुक केले. राज्याची सक्षम औद्योगिक परिसंस्था आणि उत्तम दळणवळण यंत्रणे मुळेच पुण्याची निवड करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
याशिवाय, जगप्रसिद्ध ‘बेन अँड जेरी’ज हा ब्रँड भारतात आणण्या सोबतच शाश्वत दुग्धव्यवस्थेच्या विकासा साठी महाराष्ट्रा सोबत भविष्यातही एकत्रित काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. या नव्या केंद्रामुळे पुणे शहराच्या जागतिक औद्योगिक आणि आर्थिक संपदेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
