भारत-बेल्जियम हिरे व्यापाराला नवी चालना; पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांचा विश्वास

मुंबईतील भारत डायमंड बोर्स येथे बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांचा दौरा. एचआरडी अँटवर्पचे कार्यालय मुंबईत सुरू करण्याची घोषणा व एफटीएबाबत महत्त्वाची चर्चा.

मुंबई: भारत आणि बेल्जियम यांच्यातील शतकानुशतकांची हिरे व्यापारातील ऐतिहासिक भागीदारी ही प्रामुख्याने परस्पर विश्वास, पारदर्शकता आणि दृढ सहकार्यावर आधारित असून हे परस्परसंबंध कधीही न तुटणाऱ्या ‘ॲडमास’ प्रमाणे मजबूत आहेत, अशा शब्दांत बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांनी दोन्ही देशांच्या संबंधांचा गौरव केला आहे. महाराष्ट्राचे राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC) ‘भारत डायमंड बोर्स’ (BDB) येथे आयोजित हिरे व्यापार क्षेत्रातील उद्योजकांच्या विशेष संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. या ऐतिहासिक सोहळ्यात भारत डायमंड बोर्सचे अध्यक्ष अनुप मेहता, जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलचे (GJEPC) अध्यक्ष किरीट भन्साली यांच्यासह हिरे उद्योगाशी संबंधित अनेक दिग्गज उद्योजक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

           भारत भेटी दरम्यान मुंबई आणि अँटवर्प या दोन्ही प्रमुख शहरांच्या आर्थिक आणि व्यावसायिक महत्त्वावर भर देत पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांनी, भारत हा जगातील हिऱ्यांचे मूळ उगमस्थान असून येथील सहस्रावधी वर्षांची परंपरा अतुलनीय असल्याचे सांगितले. आजघडीला जगातील दहापैकी नऊपेक्षा अधिक हिऱ्यांवर भारतात अचूक पैलू पाडले जातात, तर बेल्जियमचे अँटवर्प शहर जागतिक हिरे व्यापाराचे प्रमुख केंद्र म्हणून कार्यरत आहे. भारतीय उद्योजकांनी सुमारे शंभर वर्षांपूर्वी अत्यंत प्रतिकूल आणि आव्हानात्मक परिस्थितीत अँटवर्पमध्ये हिरे व्यापारात आपले स्वतंत्र आणि भक्कम स्थान कसे निर्माण केले, याची आठवण त्यांनी करून दिली. अपार मेहनत, व्यावसायिक प्रामाणिकपणा आणि उच्च पातळीवरील विश्वासार्हतेच्या जोरावर भारतीय समाजाने तिथे आपले बस्तान बसवले असून आज अनेक भारतीय कुटुंबे या जागतिक उद्योगात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, असे त्यांनी नमूद केले.

      भारत ही ‘जगाची कार्यशाळा’ तर अँटवर्प हे ‘जगाला जोडणारे व्यासपीठ’ अशा परस्परपूरक भूमिका बजावत असल्याचे सांगत, दोन्ही देशांमधील व्यापार संबंधांना आणखी बळकटी देण्यासाठी ‘एचआरडी अँटवर्प’चे नवे कार्यालय लवकरच मुंबईत सुरू करण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी केली. भारतीय व्यावसायिकांना बेल्जियममध्ये सुलभ आणि विनासायास व्हिसा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगत, भविष्यातही व्यापारास अनुकूल व पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी बेल्जियम सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, भारत आणि युरोपियन संघ यांच्यात झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे (FTA) हिरे उद्योगासह विविध क्षेत्रांतील द्विपक्षीय व्यापाराला अभूतपूर्व चालना मिळेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

       या संवाद कार्यक्रमात बोलताना भारत डायमंड बोर्सचे अध्यक्ष अनुप मेहता यांनी दोन्ही देशांमधील दीर्घकालीन हिरे व्यापार भागीदारीचा सविस्तर आढावा घेतला. जागतिक स्तरावर भारतीय हिरे उद्योगाचा विस्तार करण्यात अँटवर्पने मोलाची भूमिका बजावली असून, भारत डायमंड बोर्स हे आज जगातील सर्वात मोठे हिरे व्यापार केंद्र बनले आहे. येथे सुमारे २५०० कार्यालयांच्या माध्यमातून दररोज ४५ हजारांहून अधिक व्यावसायिक सुलभतेने व्यवहार करतात, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच भारताच्या किम्बर्ली प्रोसेस अध्यक्षपदाच्या कालावधीत बेल्जियमकडून नेहमीच सकारात्मक आणि सहकार्याची भूमिका राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जीजेईपीसीचे अध्यक्ष किरीट भन्साली यांनी, भारत डायमंड बोर्सला भेट देणारे बार्ट डी. वेव्हर हे भारता बाहेरील पहिलेच पंतप्रधान असल्याचे सांगत या ऐतिहासिक भेटीचे महत्त्व अधोरेखित केले. २०२५-२६ या आर्थिक वर्षात दोन्ही देशांमधील रत्न व दागिन्यांचा व्यापार सुमारे ३.५ अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचल्याची माहिती त्यांनी दिली. भारत-युरोपियन संघ मुक्त व्यापार करारामुळे आगामी काळात व्यापार, गुंतवणूक आणि औद्योगिक सहकार्याच्या नवनवीन सुवर्णसंधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

       या उच्चस्तरीय बैठकीत भारत-बेल्जियम हिरे व्यापार संबंध अधिक व्यापक आणि दृढ करण्यासाठी सहकार्य वाढविण्या बाबत अतिशय सकारात्मक चर्चा पार पडली. आगामी काळात दोन्ही देशांमधील उद्योग, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि गुंतवणुकीच्या नव्या क्षितिजांवर प्रगतीच्या अपूर्व संधी उपलब्ध होणार असल्याचा आशावाद या वेळी व्यक्त करण्यात आला. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास बेल्जियमचे राजदूत डिडिएर व्हॅंडरहासेल्ट, महा वाणिज्यदूत फ्रँक गीर्केन्स, भारताचे बेल्जियममधील राजदूत प्रणय वर्मा यांच्यासह हिरे क्षेत्रातील अनेक नामवंत उद्योगपती उपस्थित होते.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

ध्वनि मर्यादा ओलांडणाऱ्यांवर पोलिसांचा दणका, साउंड सिस्टिम जप्त होणार

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software