- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- ठाकरे गटाचे १४ आमदार फोडणार? भरत गोगावलेंचे सूचक विधान
ठाकरे गटाचे १४ आमदार फोडणार? भरत गोगावलेंचे सूचक विधान
रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांचे 'ऑपरेशन टायगर'वर सूचक विधान. ठाकरे गटातील १४ आमदारांच्या प्रवेशाच्या चर्चांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
रायगड: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे १४ आमदार फोडण्यासाठी शिंदे सेनेकडून 'ऑपरेशन टायगर' राबवले जात असल्याच्या चर्चेला आता रायगडचे नवनिर्वाचित पालकमंत्री भरत गोगावले यांच्या एका सूचक वक्तव्यामुळे अधिक उधाण आले आहे. "काही गोष्टी झाकली मूठ सव्वा लाखाची असते, सगळंच उघड करायचं नसतं; ज्यावेळेस ऑपरेशन यशस्वी होईल, त्यावेळेला आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला स्वतः सर्व सांगतील," असे म्हणत गोगावलेंनी आगामी काळात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. शिंदे साहेबांची काम करण्याची पद्धत सर्वांनाच ठाऊक आहे, असे सांगत त्यांनी विरोधकांच्या वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
रायगडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना भरत गोगावले यांनी विविध मुद्द्यांवर दिलखुलास चर्चा केली. पालकमंत्री पदासाठी केलेल्या नवसाच्या चर्चेवर बोलताना ते म्हणाले की, आम्ही हिंदुत्ववादी विचारांचे लोक आहोत आणि आमच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी देवाकडे जे मागितले, त्यात काहीही चुकीचे नाही. देवाला नमस्कार करणे आणि गोरगरिबांचे आशीर्वाद घेणे हे आमचे कर्तव्यच आहे. आपला पालकमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत उत्कृष्ट काम करण्याची इच्छा व्यक्त करत, जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, मंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन विकासाचा गाडा पुढे नेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, रायगडच्या पालकमंत्री पदाच्या घोषणेवरून महायुती मध्ये मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या श्रेयवादावर त्यांनी एका मिश्किल टिप्पणीतून टोला लगावला. पालकमंत्री पदाचे अधिकृत 'डिक्लरेशन' मिळवण्यासाठी मला थेट आग्र्याला जावे लागले, अशी कोटी करत त्यांनी या नियुक्ती मागील राजकीय संघर्षावर प्रकाश टाकला. मागील काही महिन्यांपासून रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिंदे सेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (सुनील तटकरे गट) यांच्यात राजकीय चढाओढ सुरू होती. यापूर्वी आमदार महेंद्र दळवी यांनीही दीड वर्ष हे पद अडवून ठेवल्याचा आरोप केला होता. आता भरत गोगावले यांच्या आग्रा आणि डिक्लरेशनच्या विधानामुळे महायुती मधील अंतर्गत राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याची चर्चा रंगली आहे.
या मुलाखतीत बोलताना त्यांनी आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवरही भाष्य केले. खारपाडा टोलनाक्याबाबत बोलताना ते म्हणाले की, रस्ता पूर्ण झाल्यावर बिनधास्त टोल घ्या, त्याला आमचा कोणताही विरोध नाही; परंतु अपूर्ण रस्त्यासाठी नागरिकांकडून टोल आकारला जाणे चुकीचे आहे. या संदर्भात आपण उद्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पुन्हा सविस्तर चर्चा करून हा टोल थांबवण्यासाठी ठोस प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, कर्जत तालुक्यातील एका अंगणवाडीत बालकांना निकृष्ट दर्जाचा आहार पुरविल्या गेल्याच्या तक्रारीची गंभीर दखल त्यांनी घेतली असून, याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची तातडी नुकतीच मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या गंभीर विषयावर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
