- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- शिवसेना शहरप्रमुख राहुल घरतांची पक्षातून हकालपट्टी; शिंदेंची घोषणा
शिवसेना शहरप्रमुख राहुल घरतांची पक्षातून हकालपट्टी; शिंदेंची घोषणा
पालघर मधील रुग्णालयात डॉक्टरांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शिवसेना शहरप्रमुख राहुल घरत यांची पक्षातून हकालपट्टी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गोव्यातून घोषणा.
पणजी: पालघर मधील एका खासगी रुग्णालयात वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत आणि डॉक्टरां सोबत घडलेल्या कथित गैरवर्तन व मारहाणीच्या गंभीर घटनेची शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात दोषी आढळलेले शिवसेनेचे पालघर शहर प्रमुख राहुल घरत यांना पक्षातून निलंबित करून त्यांची तडका फडकी हकालपट्टी करण्यात येईल, अशी स्पष्ट घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. गोव्यात आयोजित पश्चिम विभागीय परिषदेच्या उच्चस्तरीय बैठकीत सहभागी झाल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पक्षाची भूमिका अत्यंत कडक शब्दांत स्पष्ट केली.
पालघर मधील ही संपूर्ण घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे नमूद करत एकनाथ शिंदे म्हणाले की, डॉक्टर किंवा रुग्णालयातील कोणत्याही कर्मचाऱ्याला मारहाण करणे किंवा त्यांच्याशी असभ्य वर्तन करणे कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय नाही. उपचारा दरम्यान काही त्रुटी, गैरप्रकार किंवा नागरिकांची कोणतीही तक्रार असल्यास त्यासाठी कायदेशीर मार्ग पूर्णपणे उपलब्ध आहेत. संबंधितांनी पोलिसांकडे अथवा सक्षम प्रशासकीय यंत्रणेकडे अधिकृत तक्रार करणे अपेक्षित होते; परंतु स्वतः कायदा हातात घेऊन डॉक्टर किंवा वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हात उगारण्याचा अधिकार कोणालाही नाही. संबंधित व्यक्ती पक्षाच्या कोणत्याही महत्त्वाच्या पदावर कार्यरत असली तरी अशा प्रकारच्या मनमानी व कायदा मोडणाऱ्या घटनांना शिवसेना कधीही खपवून घेणार नाही आणि पाठीशी घालणार नाही, असा कडक इशारा त्यांनी यावेळी दिला. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून शिस्तभंगाचे असे प्रकार सहन केले जाणार नाहीत, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना कायद्याच्या चौकटीत राहण्याचे आवाहन केले.
दरम्यान, या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी गोव्यातील राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले. महाराष्ट्र आणि केंद्राप्रमाणेच गोव्यातही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युतीत असून दोन्ही पक्ष एकाच हिंदुत्ववादी विचारधारेने जोडलेले घट्ट मित्रपक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी गोवा निवडणुकी बाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, निवडणूक आयोगाकडून निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर शिवसेना आपली राजकीय रणनीती आणि भूमिका निश्चित करेल. याशिवाय, निवडणूक प्रक्रिये दरम्यान खोटी कागदपत्रे सादर करणे किंवा महत्त्वाची माहिती जाणीवपूर्वक लपवून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर प्रशासना कडून कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले. पालघर मधील मारहाणीच्या प्रकरणात थेट आपल्याच पक्षाच्या शहर प्रमुखावर निलंबनाची कठोर कारवाई करण्याची घोषणा केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून, या भूमिकेमुळे कायदा हातात घेणाऱ्यांना पक्षाकडून मोठा संदेश मिळाला आहे.
