साताऱ्यात राजकीय संघर्ष पुन्हा पेटला; शिवेंद्रसिंहराजेंचा विरोधकांना इशारा

साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यातील वाद पुन्हा उफाळला. जिल्हा बँक निवडणुकीच्या ठरावांवरून जावळीत राजकीय वातावरण तापले.

सातारा: सातारा आणि जावळी मतदार संघातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले असून, भाजपचे नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) यांचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यातील पारंपरिक व टोकाचा राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. जावळीतील दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने आयोजित सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विरोधकांचा कडाडून समाचार घेतला आणि थेट "जंगल मे घुमते वक्त जंगल खामोश है, इसका मतलब ये मत समझो की जंगल मे शेर नही है," अशा अत्यंत आक्रमक शब्दांत सूचक इशारा दिला आहे. त्यांच्या या तडाखेबंद भाषणामुळे सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून आगामी काळातील संघर्षाची ठिणगी पडल्याचे मानले जात आहे.

       सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या जिल्ह्यात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. या महत्त्वाच्या निवडणुकीत विविध सोसायट्यांचे आणि संस्थांचे ठराव आपल्या बाजूने घेण्यासाठी दोन्ही नेत्यांच्या गटांमध्ये मोठी रस्सीखेच सुरू असून, याच ठरावांच्या मुद्द्यावरून काही दिवसांपूर्वी शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यामध्ये जाहीर खडाजंगी पाहायला मिळाली होती. या वादानंतर जावळीतील राजकीय तापमान सतत वाढलेले असून दोन्ही नेत्यांचे समर्थक आमने सामने आल्याचे चित्र आहे. दहीहंडी उत्सवाच्या मंचावरून बोलताना शिवेंद्रसिंहराजे यांनी अप्रत्यक्षपणे शशिकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधत, आम्हाला उगीच डिवचण्याचे किंवा नाहक त्रास देण्याचे प्रयत्न करू नका, ते तुम्हाला अजिबात परवडणार नाही, अशी तंबी दिली आहे.

       सातारा-जावळीच्या राजकारणात शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि शशिकांत शिंदे हे दोघेही प्रबळ नेते मानले जातात आणि त्यांच्यात गेली अनेक वर्षे तीव्र राजकीय वर्चस्ववाद सुरू आहे. गेल्या चार ते पाच वर्षांत जिल्हा मध्यवर्ती बँक, विविध सहकारी संस्था तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने या दोन्ही नेत्यांमध्ये अनेकदा उघड वाद झाले आहेत. आता जिल्हा बँकेच्या ठरावांच्या मुद्यावरून या दोन्ही नेत्यांमधील 'तू तू मैं मैं' पुन्हा एकदा सुरू झाल्याने स्थानिक राजकारण चांगलेच तापले आहे. मंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शिवेंद्रसिंह राजे यांनी घेतलेली ही आक्रमक आणि रोखठोक भूमिका पाहता, आगामी काळात सातारा जिल्ह्याचे सहकार आणि राजकीय क्षेत्र अधिकच ढवळून निघण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

पेपरफुटीवरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल; टास्क फोर्सवर सवाल

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software