- Hindi News
- पुणे
- एमपीएससी अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्या साठी पुण्यात विद्यार्थ्यांचा महाआक्रोश
एमपीएससी अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्या साठी पुण्यात विद्यार्थ्यांचा महाआक्रोश
पुण्यात MPSC परीक्षांमधील गैरप्रकारां विरोधात हजारो विद्यार्थ्यांचा महाआक्रोश मोर्चा. MPSC अध्यक्ष व सचिवांच्या राजीनाम्याची मागणी; डॉ. विश्वजीत कदम व काँग्रेसचा पाठिंबा.
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा प्रक्रियेतील सातत्यपूर्ण गैरप्रकार, निकालां मधील अनाकलनीय गोंधळ आणि प्रशासनाच्या ढिसाळ कारभारा विरोधात पुण्यात हजारो विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत काढलेला विराट आक्रोश मोर्चा आता राज्यभरात तीव्र चर्चेचा विषय ठरला आहे. परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणणे आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या MPSC चे अध्यक्ष व सचिवांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी हा महामोर्चा काढण्यात आला होता. पुण्यातील ऐतिहासिक ओंकारेश्वर मंदिर चौकापासून सुरू झालेला हा मोर्चा हजारो विद्यार्थ्यांच्या घोषणाबाजीतून मार्गक्रमण करत थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकून प्रशासनाला जाब विचारणारा ठरला.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो तरुणांच्या उज्वल भविष्याशी आणि कष्टांशी संबंधित असलेल्या या गंभीर प्रश्नावर केवळ विद्यार्थी संघटनाच नव्हे, तर राजकीय पक्षांनीही उघडपणे उडी घेतली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आवाहनानंतर या आंदोलनाला व्यापक पाठिंबा मिळाला असून, माजी मंत्री व आमदार डॉ. विश्वजीत कदम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, काँग्रेसचे वरिष्ठ नेते मोहन जोशी, प्रशांत जगताप, दीप्ती चौधरी, भाऊसाहेब आजबे, हनुमंत पवार, तसेच एनएसयूआय आणि युवक काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते या मोर्चामध्ये प्रत्यक्ष सहभागी झाले होते. मोर्चेकऱ्यांच्या हातात निषेधाचे फलक होते आणि संपूर्ण परिसर विद्यार्थ्यांच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता.
आंदोलना दरम्यान प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आमदार विश्वजीत कदम यांनी राज्य सरकार व MPSC प्रशासनावर अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले. राज्यातील लाखो तरुण अहोरात्र काबाडकष्ट करून, कौटुंबिक व आर्थिक अडचणींचा सामना करत स्पर्धा परीक्षांची तयारी करतात; मात्र वारंवार परीक्षा प्रक्रियेत होणारे पेपरफुटीचे प्रकार आणि निकालातील घोळामुळे त्यांच्या मेहनतीवर आणि स्वप्नांवर पाणी फिरले जाते, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. या संपूर्ण अनागोंदी कारभाराची नैतिक जबाबदारी प्रशासनाने आणि संबंधितांनी निश्चित केली पाहिजे, असे सांगत परीक्षा व्यवस्थेत तातडीने पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्यासाठी अध्यक्ष व सचिवांनी पायउतार होणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या या न्याय्य आणि हक्काच्या लपड्याला राष्ट्रीय पातळीवरूनही पाठबळ लाभले असून, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाशी सहमती दर्शवत त्यांच्या प्रलंबित व महत्त्वाच्या प्रश्नांवर शासनाने कोणतीही दिरंगाई न करता तातडीने ठोस कार्यवाही करावी, अशी आग्रही भूमिका मांडली आहे. MPSC च्या कारभारा विरोधात रस्त्यावर उतरलेला हा लढा आता केवळ विद्यार्थ्यांपुरता मर्यादित न राहता राज्य पातळीवरील एक मोठा राजकीय लढा बनत चालल्याने, या तीव्र रोषानंतर शासन आणि आयोग नेमकी काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.
