- Hindi News
- पुणे
- एमपीएससी आंदोलनावरून रोहिणी खडसेंचा सरकारवर हल्लाबोल
एमपीएससी आंदोलनावरून रोहिणी खडसेंचा सरकारवर हल्लाबोल
पुण्यात MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून रोहिणी खडसेंची राज्य सरकारवर कडक टीका. MPSC अध्यक्ष व सचिवांच्या राजीनाम्याची मागणी; पेपरफुटी तपासात धक्कादायक खुलासे.
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील सातत्यपूर्ण पेपरफुटी, गैरप्रकार आणि प्रशासनाच्या भोंगळ कारभारा विरोधात पुण्यात हजारो विद्यार्थ्यांनी काढलेला विराट 'आक्रोश मोर्चा' हा थेट राज्य सरकारच्या ढिसाळ कारभाराचा व अपयशाचा ढळढळीत पुरावा असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या मुलांच्या भविष्याशी खेळणाऱ्या प्रशासना विरोधात आक्रमक भूमिका घेत त्यांनी MPSC च्या अध्यक्ष आणि सचिवांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्य सरकारला धारेवर धरताना रोहिणी खडसे यांनी विद्यार्थ्यांच्या वेदनांना वाचा फोडली. या आंदोलनात रस्त्यावर उतरलेली मुले ही सर्वसामान्य शेतकरी आणि अहोरात्र राबणाऱ्या कष्टकऱ्यांची असून, त्यांच्या उच्च शिक्षणासाठी काहींच्या आई-वडिलांनी आपल्या जमिनी विकल्या आहेत तर काहींनी आयुष्यभर फेडता येणार नाही एवढे अवाढव्य कर्ज काढले आहे. मात्र, या विद्यार्थ्यांच्या कष्टांची आणि उज्वल भविष्याच्या स्वप्नांची पेपर फोडणाऱ्या रॅकेटने अक्षरशः राखरांगोळी केली आहे. राज्यकर्त्यांना व माय-बाप सरकारला जनाची नाही तरी किमान मनाची लाज असेल तर त्यांनी या लाखो तरुण-तरुणींच्या रोषाकडे दुर्लक्ष न करता तातडीने कठोर पावले उचलली पाहिजेत, असे म्हणत त्यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. प्रशासनाच्या या मनमानी कारभारा विरुद्ध तरुणांमधील वाढता असंतोष पाहता सरकारपुढील अडचणी वाढताना दिसत आहेत.
एकीकडे विद्यार्थ्यांचे हे आंदोलन राज्यभर चर्चेचा विषय ठरत असतानाच, दुसरीकडे राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणांच्या समांतर तपासालाही प्रचंड वेग आला आहे. गाजलेल्या ड्रग इन्स्पेक्टर पेपरफुटी प्रकरणात नंदुरबार येथून ऋतुजा पाटील नावाच्या संशयित तरुणीला पोलिसांनी अटक केली असून, या प्रकरणाच्या तपासात आता एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. तपासा दरम्यान यंत्रणेच्या हाती लागलेले तब्बल २७० पानांचे व्हॉट्सॲप चॅट्स या संपूर्ण रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी एक नवी आणि निर्णायक दिशा देणारे ठरले आहेत. तपासा दरम्यान असेही समोर आले आहे की, या गुन्ह्यातील संशयित आरोपी ऋतुजा पाटील हिने पुरावा नष्ट करण्याच्या कुत्सित हेतूने आपला मोबाईल फोन थेट उल्हास नदीत फेकून दिला होता. या नवनवीन खुलाश्यांमुळे स्पर्धा परीक्षां मधील गैरप्रकारांचे लोण किती दूरवर पसरले आहे, हे स्पष्ट होत असून या प्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाईकडे आणि शासनाच्या भूमिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
